*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मज विठ्ठल भेटला*
प्रपंचात अडकलो
नाही मंदिरात गेलो
नाही अभंग गायला
मज विठ्ठल भेटला
माझ्या संसाराचा गाडा
नीटनेटका रेटला
नाही नमस्कार केला
मज विठ्ठल भेटला
मुलाबाळांच्या साठी
कष्ट केले दिन रात
मुलाबाळांत दंगला
मज विठ्ठल भेटला
आला याचक दाराशी
गेलो असे स्वागताला
दानधर्म त्याज केला
मज विठ्ठल भेटला
दिन अनाथ बालक
दिसला जरी मजला
घास मुखींचा भरविला
मज विठ्ठल भेटला
मळा माझा सजविला
पाणी गहू जोंधळाला
वेली वेलीच्या फळाला
मज विठ्ठल भेटला
हिरव्यागार झाडावर
पक्षी पाखरांच्या संग
ओवी अभंग गायला
मज विठ्ठल भेटला
केला प्रणाम सुर्याला
राती चंद्र चांदण्यांशी
गप्पा कित्येक मारल्या
मज विठ्ठल भेटला
घरातल्या देवाऱ्याची
केली नित्य नेम पुजा
रोज नेवैद्य अर्पिला
मज विठ्ठल भेटला
माझी आई माझा बाप
हीच माझी पंढरी
त्यांच्या सेवेत दंगला
मज विठ्ठल भेटला
*शीला पाटील चांदवड*
