थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; कर्मचाऱ्यांकडून मनापासून आभार व्यक्त
संवाद कार्यक्रमात भावनिक क्षण; नागरिक-लोकप्रतिनिधी नात्याची पुन्हा प्रचिती
सिंधुनगरी / प्रतिनिधी :
आपल्या समस्या मांडल्यानंतर त्या सुटाव्यात, ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते. मात्र त्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर कृतज्ञतेने पुन्हा भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद — हा कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी मोठा सन्मान ठरतो. असाच हृदयस्पर्शी अनुभव शनिवारी झालेल्या नागरिक संवाद कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी अनुभवला.
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून थकीत असलेला पगार हा गंभीर प्रश्न मागील संवाद कार्यक्रमात मांडण्यात आला होता. संबंधित ठेकेदार कंपनीकडून वेतन वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. या समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला.
आपला प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी युगंधर तेंडोलकर, गौरेश केळुसकर, रोशनाली परब, श्रमिका मस्के, वैभवी चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग नगरीत येत पालकमंत्र्यांची भेट घेतली. संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी कृतज्ञतेने आभार मानले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, डोळ्यांतली समाधानाची चमक आणि मनापासून व्यक्त झालेली भावना — हे दृश्य उपस्थितांसाठीही भावूक करणारे ठरले.
नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नातं अधिक दृढ होत असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
