हुमरमळा येथे अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत तलाठी पूजा भोरे यांचा सन्मान
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानातील उत्कृष्ट कामगिरीची दखल; ग्रामपंचायत इमारतीत तलाठी कार्यालयाची सुरुवात
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) गावातील तलाठी पूजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना अतुल बंगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, हुमरमळा वालावल ग्रामपंचायत इमारत पूर्ण झाल्याने सोमवारपासून तलाठी कार्यालय याच इमारतीत सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी स्वतंत्र सजा असूनही जागेअभावी हुमरमळा-वालावलचा कारभार पाट येथून पाहिला जात होता.
तलाठी पूजा भोरे यांनी अभियान काळात उत्पन्न दाखले, वारस नोंदी तसेच संजय गांधी निराधार योजनेसह विविध कामांना गती देत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. बंगे यांनी तलाठी कार्यालयासाठी दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट भेट दिले. तसेच गावातील नागरिकांना कायमस्वरूपी आणि तत्पर सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामअधिकारी अपर्णा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश मयेकर आदी उपस्थित होते.
