“आयकॉन ऑफ द डिकेड’ पुरस्कार प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना जाहीर..
समाजातील प्रगतीशील परिवर्तनासाठी शिक्षण, साहित्य आणि प्रेरणा या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.या तीनही क्षेत्रात आयुष्यभर काम करणारे मिशन आयएएस, अमरावतीचे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना नाशिक येथील प्रतिष्ठित “Icon of the Decade 2026” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर होणे, ही केवळ एक औपचारिक बाब नसून त्यांच्या प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कार्याचा सन्मान आहे.
वयाच्या ७२ व्या वर्षीही अविरत कार्यरत असलेले प्रा. काठोळे हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविणारे दीपस्तंभ ठरले आहेत. “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक आयएएस दडलेला आहे,” या त्यांच्या विचारातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज रोवले. “मिशन आयएएस” या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम केले आणि या स्पर्धा परीक्षेला एक सामाजिक चळवळीचा मार्ग बनविले.
दरवर्षी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विदर्भातील तसेच उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद स्वतः अनुभवनारे आणि तो आनंद व उत्साह समाजापर्यंत पोहोचविणारे प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे.या स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याची त्यांची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. त्यांच्या ‘मी आयएएस होणारच’ या विषयावरील १५ हजारांहून अधिक व्याख्यानांनी देशभरातील विद्यार्थ्यांना नवे स्वप्न पाहण्याची ताकद दिली आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचे मार्गदर्शन हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नाही. तर वेळेचे नियोजन, सातत्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. केवळ एक रुपयात मिशन आयएएसमध्ये प्रवेश देऊन त्यांनी हे स्पर्धा परीक्षेचे शिक्षण सर्वांसाठी खुले केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी प्रशासन सेवेत यशस्वी झाले असून, समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे अनमोल कार्य ते करीत आहेत.
याचबरोबर त्यांचा साहित्यप्रवासही तितकाच समृद्ध आणि प्रेरणादायी आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी तब्बल ७६ पुस्तके लिहून एक अद्वितीय ठसा उमटवला आहे. “स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी” आणि “शेतकऱ्यांची मुले झाली कलेक्टर” यांसारख्या पुस्तकांनी विद्यार्थ्यांना दिशा आणि प्रेरणा दिली आहे. कथा, कविता, ललित लेखन आणि स्पर्धा परीक्षेवरील मार्गदर्शन अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी साहित्यनिर्मिती केली आहे.
त्यांच्या घरातील समृद्ध पुस्तकालय हे ज्ञानाचे जिवंत मंदिरच आहे. प्रत्येक पुस्तकावर असलेले त्यांचे प्रेम आणि विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याची त्यांची सवय ही त्यांच्या ज्ञानसेवेची खरी ओळख आहे. “पुस्तक हेच सर्वात सुंदर गिफ्ट आहे,” या त्यांच्या विचारातून त्यांनी ज्ञान वाटण्याची संस्कृती रुजवली. १९७२ मध्ये “बहुजन साहित्य परिषद” स्थापन करून त्यांनी नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि साहित्याला सामाजिक दिशा दिली.
दरवर्षी आयोजित करण्यात येणारी १५ दिवसांची निवासी संस्कार शिबिरे ही त्यांच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जिज्ञासा आणि मोठे ध्येय ठेवण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविला आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना जाहीर झालेला “आयकॉन ऑफ द डिकेड” हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या ज्ञानसेवेचा, साहित्यनिर्मितीचा आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेल्या अथक परिश्रमांचा सन्मान आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला केवळ गौरव देणारा नाही, तर समाजासाठी त्यांनी उभ्या केलेल्या आदर्शाची पावती आहे.
या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांची उपस्थिती लाभणार असून, विविध मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव सोहळा अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील इबीस हॉटेल मध्ये शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता “आयकॉन ऑफ दि डिकेड” प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. समाजातील विभिन्न क्षेत्रातील स्वकर्तृत्व,उत्कृष्ट कार्य, नेतृत्वगुण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा हा सन्मान असून त्यामध्ये अमरावतीचे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा समावेश आहे. प्रा. डॉ. काठोळे हे केवळ शिक्षक नाहीत, तर ते एक विचार, एक चळवळ आणि एक प्रेरणा आहेत. त्यांनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत अशीच हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश देत राहो, हीच या जीवन गौरवाच्या निमित्ताने समाजाची कृतज्ञ भावना आहे.
=============
रवींद्र दांडगे
जनसंपर्क अधिकारी
मिशन आय ए एस
अमरावती
