वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात सुविधांबाबत आ. राणे यांनी घेतला आढावा : वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत घेतले फैलावर
वैभववाडी
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे. त्याचे उत्तम उदाहरण वैभववाडी ग्रामीण रुग्णालय आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या आढावा बैठका केवळ फोटोसेशनसाठी आहेत का? सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीम नेमकं कोणतं काम करत आहे असा सवाल आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी आरोग्य विषयक जबाबदारी घेत नसतील तर मी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी स्वतः घेत आहे. यापुढील काळात रुग्णालयात लागणारा सर्व औषध पुरवठा व इतर सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी आमची राहील. अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा पुर्णतः बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी रूग्णालयाला भेट देत आढावा घेतला. यावेळी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, हर्षदा हरयाण, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयातील रिक्त जागा, पाणीटंचाई, अपुऱ्या औषध पुरवठा आदी विषयाच्या बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्याच्या बजेटमधून 23 कोटी निधी आरोग्य यंत्रणेला देण्यात आला आहे. त्यापैकी आठ ते नऊ कोटी निधी कोरोनावर खर्च झाले आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयात स्वच्छता कामगार नाही, औषधे नाही, इतर गैरसोयी वाढत आहेत. मग बजेटमधील निधीकडे फक्त बघत बसायचे का ? असा सवाल अधिकाऱ्यांना आ. नितेश राणे यांनी केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून राजीनामा दिलेल्या डॉ. धर्मे यांना आ. राणे यांनी फोन लावत ‘तुम्ही परत या’ अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉ. धर्मे यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात लवकरच हजर होतो. असे सांगितले.
ग्रामीण रुग्णालयातील क्लार्क रोज दारू पिऊन येत असल्याची तक्रार उपस्थित महीला कर्मचाऱ्यांनी आमदारांकडे केली. तुझी दारू उतरवून टाकेन, ड्युटीवर अजिबात दारू पिऊन यायचं नाही. अशी तंबी त्या कर्मचाऱ्याला आ. राणे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न लवकर सोडवा अशी सूचना आ. नितेश राणे यांनी मुख्याधिकारी कांबळे यांना दिल्या.