ड्रोन, सेन्सर्स व प्रिडिक्टिव्ह मॉडेलच्या मदतीने रोग नियंत्रण आणि उत्पादनवाढीवर भर – मंत्री नितेश राणे यांची माहिती
मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आंबा व काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांची निवड करून प्रयोग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
या संदर्भात एडीटी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे तज्ज्ञ निलेश नलावडे यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक डॉ. भूषण गोसावी, मृदा विज्ञान तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे, वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे डॉ. वैभव शिंदे, तसेच इतर तज्ज्ञ उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची मूलभूत माहिती संकलित करून त्यांच्या शेतीचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. प्रारंभी निवडलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यात येईल.
या प्रकल्पांतर्गत शेतीत सेन्सर्स बसवून माती, झाडांची वाढ आणि उत्पादन स्थितीचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुमारे १५० दिवसांचा पहिला टप्पा ठेवण्यात आला असून २०-२५ शेतकऱ्यांच्या गटांमध्ये काम केले जाईल.
तज्ज्ञांच्या मते, पारंपरिक पद्धतीने ४-५ दिवस लागणारी फवारणी ड्रोनच्या मदतीने काही तासांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे रोग नियंत्रण जलद आणि प्रभावी होणार आहे. तसेच AI आधारित प्रिडिक्टिव्ह मॉडेलमुळे पिकांवरील रोगांचा अंदाज आधीच घेता येणार असून कीटकनाशकांचा अनावश्यक वापर आणि काळाबाजारालाही आळा बसेल.
या नव्या तंत्रज्ञानामुळे सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेती अधिक स्मार्ट, उत्पादनक्षम आणि शाश्वत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
