कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष आणि संवेदनशील कवी दीपक पटेकर उर्फ दीपी यांच्या पहिल्यावहिल्या वृत्तबद्ध काव्यसंग्रह ‘बकुळीची फुले’चे प्रकाशन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सावंतवाडीतील केशवसुत कट्टा तुतारी जवळ संपन्न होणार आहे. मराठी साहित्याच्या पंढरीत नव्या काव्यकृतीची भर घालणारा हा सोहळा साहित्य रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ मालवणी कवी विनय सौदागर हे भूषविणार आहेत. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, साहित्यिका सौ. उषा परब आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दीपक पटेकर यांचा ‘बकुळीची फुले’ हा ६० वृत्तबद्ध कवितांचा संग्रह असून, त्यांच्या लेखनाचा हा नवा टप्पा आहे. पटेकर यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल आश्वासक राहिली आहे. त्यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक मराठी-हिंदी कविता, तर १०० हून अधिक ललित लेख, कथा आणि सामाजिक विषयांवरील लेखन केले आहे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. ‘संवाद’ दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून ते गेली पाच वर्षे जबाबदारी सांभाळत आहेत. नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर त्यांनी आपल्या काव्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली होती.
सावंतवाडीच्या साहित्य संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या कविवर्य केशवसुत कट्ट्यावर होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला सर्व साहित्य प्रेमींनी, वाचकवर्ग आणि मित्रमंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी दीपक पटेकर यांच्यासह कोमसापच्या आयोजन समितीचे सदस्य सचिव राजू तावडे, श्री भरत गावडे (मराठी साहित्य संस्कृती मंडळ सदस्य), कवी विठ्ठल कदम (मराठी साहित्य संस्कृती मंडळ सदस्य), कोमसाप उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, सह सचिव विनायक गांवस आणि प्रा. रुपेश पाटील यांनी केले आहे.
