सभापती सिद्धेश रावराणे यांचा अभिनव निर्णय; फेसबुक-इन्स्टाग्रामवर ‘पंचायत समिती वैभववाडी’ पेज, सेवा अधिक जलद व पारदर्शक होण्याची अपेक्षा
वैभववाडी / प्रतिनिधी :
वैभववाडी पंचायत समिती हायटेक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत सभापती सिद्धेश रावराणे यांनी तालुकावासीयांसाठी अभिनव निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी पंचायत समितीच्या नावाने सोशल मीडियावर अधिकृत खाती सुरू करण्यात आली आहेत.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर ‘पंचायत समिती वैभववाडी’ या नावाने पेज तयार करण्यात आले असून, या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी तसेच सूचना थेट मांडता येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सोशल मीडिया खात्यांचे अनावरण पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत जलद सेवा पोहोचवण्याचा पंचायत समितीचा हा प्रयत्न असल्याचे रावराणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयामुळे तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, प्रशासन अधिक गतिमान व उत्तरदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
