नांदगाव रास्ता रोको प्रकरणी राजू शेट्टी, वैभव नाईकांसह ३७ जणांवर गुन्हे दाखल
आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी आंदोलन; प्रशासनाने विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
कणकवली :
आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नांदगाव येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह ३७ जणांवर कणकवली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
हे आंदोलन स्थगित करताना राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कुणावरही गुन्हे दाखल करू नयेत, अशी विनंती केली होती. मात्र, या विनंतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत सर्वांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या आंदोलनात सुमारे ५० ते ६० जण सहभागी झाले होते. त्यापैकी ३७ जणांवर मनाई आदेशाचा भंग, महामार्गावरील वाहतूक अडवणे, रस्त्यावर बसून व चालत जाऊन वाहनांना अडथळा निर्माण करणे तसेच जमावाला भडकविण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात शेतकरी नेते देवाप्पा उर्फ राजू शेट्टी (शिरोळ, कोल्हापूर), स्वस्तीक पाटील (इचलकरंजी), माजी आमदार वैभव नाईक (कणकवली), उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १२६(२), १९०, २८५, २२३ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१), (इ), (फ), ३७ (३), १३५(१), १३५(३) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेबाबत पोलीस पांडुरंग कळंत्रे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.
