*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग : ५६
*आदर्श शाळा*
“आदर्श चो अर्थ काय?” आल्या आल्याच काकल्याने प्रश्न केला.
“का रे?” मी उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला; कारण एकतर मला निश्चित अर्थ आठवेना आणि दुसरे म्हणजे, काकल्या कोणत्या उद्देशाने हे विचारतोय, तेही समजेना.
“परवा झिलाच्या मावाड्याक गेल्लय. थुयल्या शाळेक आदर्श शाळा हून बक्षीस मेळलाहा.” काकल्याने स्पष्ट केले.
“अरे, मग छानच. चांगली गोष्ट आहे ही. त्यात अर्थ कसले शोधतोय?” मी टोकले.
“तसा न्हय. थयलो हेडमास्तर सुनेकडे इन्व्हर्टर मागता. हुंता, इन्व्हर्टर बसयलो, तर शाळेक आजून वयला बक्षीस मेळतला.” काकल्या विषय अधिक स्पष्ट करू लागला.
” हां ,असेल तसं. सोयी सुविधांवर गुणांकन असते. तसंच मुलांना शाळेविषयीच्या आकर्षणात भर पडते.” मी समजावले.
काकल्याला हे पटलेलं दिसलं नाही. त्याचा आवाज थोडा वरच्या पट्टीत गेला, “असा कसा? शाळा रंगयली, शीशीटीवी बसयले, काम्पुटर हाडले हुंजे आदर्श शाळा? शिक्षणाचा काय? “हळुहळू आतलं बाहेर येऊ लागलं.
“अरे शिक्षण असेलच नां? कशाला उगा नक्राश्रू ढाळतोस. ” मी विरोध केला.
“मिया त्या शाळेत जावन् इलय. जुने पाच काम्पुटर धूळ खातसत. आता नये होये हुंतत. शाळेत सात वर्ग, त्रेचाळीस पोरा, चार मास्तर. कसला शिक्षाण? तेतूर मास्तरांका हजार कामा. माका सांग शाळ हुंजे काय? इमारत? ती शाळा मोठी, ज्येच्यात बरा शिकयला जाता. शाळेत नेमके कितके तास बरा शिकयला जाता ता सांग. पुस्तका शिकवन पूरी तरी जातत काय?” काकल्या उद्वेगाने बोलत राहिला.
माझा एक मित्र हाॅटेल लाईनमधे आहे. तो नेहमी म्हणतो, ‘हाॅटेल मध्ये किती सुविधा आहेत, त्याहून कूक कसा आहे हे महत्वाचं. पदार्थ चांगले तर गिऱ्हाईक येणार.’ तद्वत शिक्षण चांगलं असेल, तर सरकारी शाळा टिकतील, असा काकल्याचा एकंदरीत रोख होता.
मी बोलत नाही हे बघून काकल्या जायला उठला. जाता जाता म्हणाला,” वस्तू लागी करणा ठीक आसा. पून जे दिसा शाळेचो हेडमास्तर, शाळेची कमिटी, गावचे फुडारी आणि गावचे शिकलले लोक शाळेत मेळणाऱ्या शिक्षणाचो दर्जो वाढवच्या पाठी लागतीत; तिच शाळा आदर्श शाळा होतली. बाकी सऽगळा फसव्या आसा.”
काकल्या निघाला.
मनात आलं, हा गावात आहे हे बरं. शिक्षणमंत्री असता,तर गुरुजनांना याने हैराण केलं असतं. अर्थात लोकही हुशार असतात, अशांना ते गावातच ठेवतात.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
