कुडाळमध्ये ‘सिंधू सरस’ प्रदर्शन रंगले; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा नृत्यातील उत्स्फूर्त सहभाग ठरला आकर्षण
‘चिमणी पाखरं’च्या कार्यक्रमात स्टेजवर उतरून कलाकारांना दिला उत्साह; बचत गटातील महिलांशी साधला मनमोकळा संवाद
कुडाळ
कुडाळ येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गतर्फे आयोजित मिनी व जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस’ स्वयंसहायता समूह उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
संपूर्ण संध्याकाळ प्रदर्शनस्थळी घालवत त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. महिलांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली, त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध ‘चिमणी पाखरं’ नृत्य संस्थेच्या सादरीकरणाचा त्यांनी आनंद घेतला. कलाकारांच्या आग्रहास्तव त्यांनी थेट रंगमंचावर जाऊन नृत्यात सहभाग घेतला. त्यांच्या या सहज आणि मनमिळावू वर्तनाने उपस्थितांची मने जिंकली. कलाकारांचे त्यांनी मनापासून कौतुकही केले.
तसेच ‘सिंधू सरस’ प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा व्यक्त केली. सांगली जिल्हा परिषदेत प्रकल्प संचालक म्हणून काम करत असताना आयोजित ‘सरस’ प्रदर्शनाच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक श्रीमती घाणेकर यांचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कलाकार, बचत गटातील महिला आणि अधिकारी वर्ग भारावून गेला.
