दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे रोगराईची भीती; नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही – संजू परब
सावंतवाडी :
निरवडे गावात भरवस्तीच्या ठिकाणी सुरू असलेला वराह पालन व विक्रीचा व्यवसाय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे हा व्यवसाय तातडीने बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे केली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेनेकडून कारवाईची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या व्यवसायामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कोणत्याही व्यवसायाला विरोध नसला तरी लोकांच्या भावना आणि आरोग्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे संजू परब यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर निरवडे येथील ग्रामस्थांनी संजू परब यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित ठिकाणी सुरू असलेला वराह पालन व्यवसाय लोकवस्तीच्या अत्यंत जवळ आहे. त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे माशा व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार हा प्रकार सार्वजनिक आरोग्यास बाधा आणणारा असल्याचे ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत संजू परब यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा कोणताही अनधिकृत व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला. तसेच या प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विषय मांडून प्रशासनाकडून तातडीने कारवाई करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी योगेश पारकर, प्रतीक्षा पारकर, वासुदेव गावडे, विनायक राणे, आनंद गोसावी, चंद्रशेखर पेडणेकर, अशोक गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
