You are currently viewing स्वरामृताच्या सुरेल वर्षावात श्रोते चिंब

स्वरामृताच्या सुरेल वर्षावात श्रोते चिंब

*स्वरामृताच्या सुरेल वर्षावात श्रोते चिंब*

*पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा उत्साहात समारोप*

पिंपरी

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा सुरेल समारोप शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या ‘घन अमृताचा…’ या सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे संपन्न झालेल्या उत्सवाच्या अंतिम दिवशी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, भाजप पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेवक मधू जोशी, शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, डाॅ. वंदना घांगुर्डे यांच्यासह राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली; तसेच श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मंडळाच्या वतीने पारूबाई चिंचवडे यांना आदर्शमाता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

‘घन अमृताचा…’ या सांगीतिक मैफलीत सावनी रवींद्र यांनी भक्तिगीते, भावगीते, लोकप्रिय दूरदर्शन मालिकागीते आणि अभिजात मराठी चित्रपटगीतांचे प्रभावी सादरीकरण करीत स्वरामृताच्या सुरेल वर्षावात श्रोत्यांना चिंब भिजवून टाकले. उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या सांगीतिक मैफलीची सांगता त्यांनी ‘निश्चयाचा महामेरू…’ या रचनेने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मंदार गोडसे (हार्मोनियम), नितीन शिंदे (तबला), प्रतीक गुजर (पखवाज), अमृता ठाकूर – देसाई (सिंथेसाझर), ऋतुराज कोरे (रिदम मशीन), ईशा, केतन, हर्षदा, मुद्रा, तेजस (कोरस) यांनी साथसंगत केली. दीप्ती भागवत यांनी लालित्यपूर्ण शैलीतून मैफलीचे निवेदन केले.

प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा केशर दुधाने अभिषेक आणि पूजा, स्वामी गायत्री मंत्रजप, श्रींचा सामूहिक रुद्राभिषेक, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले.
दुपारी १२:३० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत सुमारे वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सत्संग मंडळ सदस्य कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा