गया (बिहार) येथे ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गला राष्ट्रीय पुरस्कार
शहीद भगतसिंग युथ ब्रिगेडकडून देशभरातील १७० हून अधिक संस्थांचा सन्मान; अमितजी आझाद यांच्या हस्ते गौरव
सिंधुदुर्ग
रक्तदान क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड, गयाजी (बिहार) या संस्थेतर्फे गया येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातील रक्तदान क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचाही गौरव करण्यात आला.
या सन्मानाचा विशेष योगायोग म्हणजे स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमितजी आझाद यांच्या हस्ते हा पुरस्कार ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव श्री. बाबली गवंडे यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यांतील १७० हून अधिक रक्तदान क्षेत्रात कार्यरत संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच नेपाळमधील काही संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तसेच सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सन्माननीय दयानंदजी गवस सर यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे संस्थेच्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेली. विशेष म्हणजे हा सन्मान स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशात क्रांती घडवणारे शहीद भगतसिंग यांच्या नावाने रक्तदान चळवळ चालवणाऱ्या संस्थेकडून मिळाल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
संस्थेच्या कार्यासाठी रात्रंदिवस धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत हा सन्मान सर्व रक्तदात्यांना समर्पित करत असल्याचे भावपूर्ण वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी गवस सर यांनी केले.
दरम्यान, संस्थेला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व हितचिंतकांनी अभिनंदन करत पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
