You are currently viewing ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन..

ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन..

मुंबई :

शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले. ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. विधान परिषदेवर अनंत तरे २००० ते २००६ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत होते. याआधी तरे ठाणे शहराचे महापौर होते.

मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या अनत तरेंवर ठाण्यातील ज्युपिटर या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनंत तरे यांच्यावर उद्या (मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन नातवंडे, मुलगी, जावई आणि भाऊ असा परिवार आहे.

अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा नवा आक्रमक नेता सक्रीय झाल्यानंतर हळू हळू तरेंचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्व कमी झाले. पण अखेर पर्यंत ते सार्वजनिक जीवनात सक्रीय होते. एकनाथ शिंदे आणि अनंत तरे यांनी एकमेकांना साथ देत शिवसेना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाढवण्याचे काम केले.

ठाणे शहराचे महापौर पद तीन वेळा भूषवण्याचा मान अनंत तरे यांना मिळाला. ते एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. ठाण्यात महापौर पदाची हॅटट्रिक साधणारे ते एकमेव आहेत. विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांचा पराभव करुन ते आमदार झाले होते. पण २०१४च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. या मुद्यावरुन ते नाराज झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा