You are currently viewing ऋतूराज वसंत

ऋतूराज वसंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*ऋतूराज वसंत* 

 

भारत देश हा ऋतूंचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये सहा ऋतू हे प्रामुख्याने एका मागून एक येतात.. या येणाऱ्या प्रत्येक ऋतूचे विशेष महत्त्व आहे… या सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा प्रत्येकालाच आवडणारा असा ऋतू आहे. वसंत ऋतूला ‘”ऋतुराज”’ असे सुद्धा म्हटले जाते. सर्व ‘”ऋतूंचा राजा’” म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो.

कुसुमाकर असेही त्याचे एक यथार्थ नाव आहे. कारण नवीन पोपटी चकचकीत, तजेलदार हिरव्यागार पालवीबरोबर अनेकानेक वृक्षवेलींच्या फुलण्याचा, बहरण्याचा हा काळ असतो… वसंत ऋतूचे वैभव हे अनन्य साधारण आहे. वसंत ऋतूला सर्व ऋतूंमध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे..

वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग हा अन्य ऋतूंमध्येही सुंदर दिसतोच. परंतू वसंत ऋतूचे आगमन होताच निसर्गाचे सौंदर्य सुंदरता अधिकच खुलते.. त्याचे रूप काही औरच असते.. आपल्या जीवनात “तारूण्य” ही हा वसंत ऋतूच असतो नाही का… त्याचप्रमाणे वसंतही निसर्गाची युवावस्था आहे बरं.

वसंत ऋतू सुंदर, मोहक आणि आकर्षक असतो. वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टीही आनंदाने फुलून जाते.. फुलून निघते.

खेळकर वसंत आपल्या अंगावरची राजेपणाची वस्त्रे उतरवून आपल्या या खेळकर चैतन्यमय खेळात निसर्ग देवतेलाही सामील करून घेतो. त्यांचा हा कौतुक सोहळा पाहाण्यासाठी सहस्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळतात.. रेंगाळू लागतात. आणि नेहमीच्या पोपट कोकीळ या परिचित पक्ष्यांबरोबरच तांबट,बुलबुल या साऱ्यांची गर्दी ऋतुराजाच्या स्वागतासाठी होते..

वसंतऋतू म्हणजे समस्त सृष्टीला हसवणारा, नटवणारा,रिझवणारा, तापवणारा,सुकविणारा आणि तृप्त करणारा सृष्टीचा प्रियकर.. ! वसंत ऋतूला ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुरेख म्हटलं आहे पहा.. “जैसे ऋतूपतीचे द्वार । वनश्री निरंतर,”वोळगे फळभार ।लावण्येसी.. तर कवी कालीदासांनी वसंताला “योद्धा’ म्हटले आहे. मदनाची सर्व आयुधे घेऊन फुलविण्यासाठी आलेला योद्धा..!

ऋतूराज वसंताचं आगमन झालं की साऱ्या निसर्गाला जणू आनंदाचं भरतं येते. चराचर सृष्टी हर्षोल्हासानं गाऊ लागते. माणसाच्या मनातही आपसूक गाणं उमलत जातं. भारतीय सण, पुराणकथांचे नायक-नायिका यांच्या जीवनातही वसंत अलवारपणे विरघळून गेलेला आढळतो.

वसंत या शब्दांतच काही जादू असावी असे मला वाटते कारण वसंत नावे असलेल्यांनी वसंतऋतू प्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. साहित्यातले वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला. तर रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वसंत नटवला ते वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी आणि आपल्या जादुई सुरावटींनी मनामनातले वसंत फुलवले ते वसंत देसाई, वसंत प्रभू यांनी… !

असा हा वसंत ऋतु तुमच्या आमच्या जीवनात येतो आनंद देतो तेव्हा म्हणावेसे वाटते, “चोहीकडून तो वसंत येतो, हासत नाचत गाणे गातो”..!!

वसंत ऋतूमध्ये थंड हवा सतत फिरत असते आणि वातावरण सुद्धा चांगले असते. कोकिळा सुद्धा आपल्या मधुर आवाजात गोड गाणे गाते..

निसर्ग माणसाला शहाणा करत असतो असे म्हणतात. तर ऋतुचक्र काहीच न बोलता कितीतरी भाव प्रकट करत हे म्हणणे किती योग्य आहे हे पटवून देत राहतो.. राहत असतो.. सुख आणि दु:ख हे ऋतूप्रमाणे आयुष्यात येत राहणारच. या दोन्ही ऋतूमध्ये आनंद घेत जगण्याचा संदेश मला मोलाचा वाटतो. जर्मनीत वसंताच्या वाटेवर चेरीचा बहर तर भारतात घरासमोरचा गुलमोहराचा बहर..आणि आंब्याचा मोहोर आसपास दरवळत राहतो..

वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळेचे कूंजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईल युगात या कार्यक्रमांचे स्वरूप जरी पालटले असले तरीही सातत्य कायम आह़े हे मात्रं नक्कीच…!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा