You are currently viewing आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत १५ ते १७ मार्चदरम्यान भव्य दशावतारी नाट्य महोत्सव

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत १५ ते १७ मार्चदरम्यान भव्य दशावतारी नाट्य महोत्सव

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत १५ ते १७ मार्चदरम्यान भव्य दशावतारी नाट्य महोत्सव

संजू परब मित्रमंडळाचा उपक्रम; ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोगांसह गरजूंना मदतीचेही कार्यक्रम

सावंतवाडी

शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजू परब मित्रमंडळाच्या वतीने १५ ते १७ मार्च या कालावधीत भव्य ‘ट्रिकसीनयुक्त’ दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा शानदार शुभारंभ होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षकांना थक्क करणारे ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १५ मार्च रोजी ‘भर्तरी पिंगळा’, १६ मार्च रोजी ‘व्यंकट रमणा जय गोविंदा’ आणि १७ मार्च रोजी ‘जिव्हेश्वर’ हे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये गरजूंसाठी फळवाटप, धान्यवाटप तसेच आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच माजी नगरसेवक गुरू मठकर यांच्या माध्यमातून सायकल वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीतील रसिकांना दर्जेदार दशावतार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार असून या तीन दिवसीय महोत्सवाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, सुधा कवठणकर, झेवियर फर्नांडिस, क्लेटस फर्नांडिस, राकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा