फाल्गुण पंचमीला प्रभानवल्ली येथे श्री आदिष्टी देवीच्या जत्रेचा भक्तिमय जल्लोष
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे दरवर्षी फाल्गुण पंचमीच्या दिवशी श्री आदिष्टी देवींची जत्रा मोठ्या उत्साहात भरते. या दिवशी गावातील पाच देवी मानकरी श्री आदिष्टी मंदिरात वास्तव्याला येतात. पारंपरिक पद्धतीने ओटी भरणे, नावासफेड आदी धार्मिक विधी पार पाडले जातात. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी रेलचेल असते.
देवीला माहेरवासिनी मानून भक्तांकडून तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवले जातात. गुलाबजाम, मोदक, पुरणपोळी, गुळपोळी आदी पदार्थांचा निवेद्य दाखवून दुपारच्या जेवणात तो प्रसाद भाविकांना दिला जातो.
रात्री पालख्या नाचवण्याचा पारंपरिक आणि आकर्षक कार्यक्रम आयोजित केला जातो. या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी रत्नागिरी परिसरासह मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी यावेळी मोठी गर्दी होते.
प्रभानवल्ली हे आजोळ असल्याने अजित नाडकर्णी आणि बंडू शेंवी परिवाराने जत्रेला उपस्थित राहून पाचही पालख्यांना नारळ अर्पण करून देवीचे दर्शन घेतले. हा सुखद आणि अविस्मरणीय अनुभव पाठीशी घेऊन “पुढच्या वर्षीही नक्की येऊ” असा संकल्प करत ते माघारी परतले.
— अजित नाडकर्णी
शुभांजित सृष्टी, फोंडाघाट
