You are currently viewing गावचा शिमगा
Oplus_16908288

गावचा शिमगा

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ मालवणी साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

*गावचा शिमगा*

(राधेचा नाच..अन् सतीची ओटी)

 

शिमगोत्सव सध्या सुरू आहे. साधारण होळीपौर्णिमेपासून धुळवडीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. होळी दिवशी सुरू झाला आणि दुसर्‍या दिवशी धूलिवंदनाला संपला, असं आमच्याकडे होत नाही. त्या त्या गावाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. पाच, सात, नऊ अगदी पंधरा दिवसापर्यंत हा उत्सव चालू राहतो. या सणाला होलीकेचं दहन होतं, असं म्हटलं जातं, त्या संदर्भात वेगळ्या पौराणिक कथाही आहेत; परंतु इकडच्या परिसरात तशी होळी पेटवली जात नाही. कचरा, टाकाऊ वस्तु एकत्र करून होळी पेटवायचे, असं काही दिसत नाही. इथे असे असते की, एखादं झाड तोडून, त्याला पानं लपेटून, वरती पताका लावून विशिष्ट ठिकाणी ती उभं करतात, त्यालाच होळी म्हणतात. गार्‍हाणं घालताना ‘बा होळग्या म्हाराज्या’ असं पण म्हणतात. होळीसाठी झाडाची निवड देखील प्रत्येक गावात वेगवेगळी असते, ती तिथली परंपरा असते. माझ्या गावात पोफळीची म्हणजे सुपारीच्या झाडाची होळी उभी करतात. शेजारच्या गावात माडाची, तर माझ्या मूळ गावात आंब्याच्या झाडाची असंच काहीसं असतं.

साधारणपणे संध्याकाळच्या वेळी होळीसाठीचं झाड तोडून गावात आणलं जातं, परंपरेने होळी कुठे उभी करायची ते स्थान निश्चित झालेलं असतं. त्या स्थानाला देखील होळीचा खुट असंच म्हणतात. झाड तोडून त्याला पानं, ध्वज, पताका, नारळ बांधून नटवल्यानंतर ती उभी करतात. आमच्या बालपणी तो मोठा उत्सव असायचा. होळी खूप वाजत गाजत आणायचे. काही जण पुढे सरकवायचे, काही जण मागे ओढायचे; अशी धमाल असायची. होळीच्या जवळचा दगड देखील छातीवर घेऊन इकडे तिकडे नाचवला जायचा. मजा यायची. आता हळुहळू याचं महत्त्व बरचसं कमी झाल्यासारखं वाटतंय. मनोरंजनाचे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत, तेही कारण असावं.

होळी उभी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी ‘हळदोणी’ असा एक कार्यक्रम असतो. होळीच्या मुळात हळदीचे पाणी शिंपडण्याचा त्याला संदर्भ आहे. मग त्या दिवसापासून गावात सोंगं फिरू लागतात, म्हणजे काहीजण वेगवेगळे वेश करून, तोंडं रंगवून घरोघरी फिरतात. ‘शबय-शबय’ म्हणत काहीतरी मागतात आणि त्यांना दान दिले जाते. आमचे बालपणी फारच सोंग॔ यायची आणि आम्ही त्यांची वाट बघत बसायचो. त्याकाळी एक वाडा राधेचा नाच करायचा, ते उत्तम गायचे आणि खूप चांगलं नाचायचे. गोमू हा शब्द इथे जास्त ऐकू येत नाही, तर राधा शब्द जास्त प्रचलित आहे. आता सोंग येण्याची मी वाट बघत असतो, पण ती फार क्वचित येतात.

आमच्या गावच्या प्रथेप्रमाणे इथे अकराव्या दिवशी धुळवड असते. त्यादिवशी मात्र तो धुळवडीचा ढोल वाजला की, सोंग यायची बंद होतात आणि मग संध्याकाळी रोंबाट.रोंबाट म्हणजे ढोलाच्या तालावर गुलाल उधळीत लोकांचा जथ्था देवळाकडे जातो,असा एकंदरीत प्रकार. शिस्त आणि बेशिस्त याचा अनोखा मिलाफ यात असतो. रोंबाट हा शब्द अगदी सुयोग्य आहे. या रोंबटाचा जोश देखील आता कमी झाला आहे. पूर्वी खूप उत्साहाने रोंबाट व्हायचं. पालख्या नाचवणे, ही प्रथा मात्र आमचेकडे नाही.

आमच्या गावात एक अनोखी प्रथा आहे, ती म्हणजे सतीची. धुळवडीच्या दिवशी दलित समाज हा कार्यक्रम करतो. एका मुलाला सती बनवलं जातं, म्हणजे त्याला स्त्रीचा वेश केला जातो. अगदी त्याचं नाक देखील टोचलं जातं, तेही करवंदीच्या काट्याने. नंतर त्या मुलात संचार येतो, अशी श्रद्धा आहे. तसं मानलंच जातं आणि नंतर मग ती सती सोबत्यांसह गावभर फिरते. अनेक लोक तिच्या ओट्या भरतात. पहाटेपर्यंत ती फिरत असते. सतीचा कार्यक्रम संपायला पहाट होऊन गेलेली असते, त्यामुळे तो समाज त्यांची धुळवड दुसऱ्या दिवशी साजरी करतो.

आपल्या मराठी वर्षाच्या शेवटी हा सण येतो. त्यामुळे त्याला मुख्यत्वे उत्सवाचे स्वरूप आहे, बाकी विशेष काही नसावं. गुढीपाडव्यापासून नव्या दमाने नवीन वर्ष सुरू करायचे असते, त्यामुळे यावेळी लोक कसेही वागले, तरी समाज त्याकडे दुर्लक्ष करतो. मागे वळून बघताना मला असं वाटतं की, समाजाच्या काही घटकांना हा आर्थिक लाभाचा सण असतो, समाजाने ती तशी त्यांची सोय केलेली होती. सतीची चाल बंद झाली हे उत्तमच, पण ही एक सती फिरवण्याची प्रथा मला खूप भावते. माझ्या घराजवळून ती पहाटे अडीच वाजता जाते. बालपणी माझ्या मित्रांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता; काशिनाथला, सुभाषला सती झालेले मी पाहिलंय.

गावच्या शिमग्यात अजून एक सुरेख प्रथा आहे, ती म्हणजे घरोघरी देवाचे निशाण येणं. देवस्थानची सर्व समावेशक मंडळी घरी येतात. सोबतची देवाची पताका छताला स्पर्शवितात, तेव्हा खूप बरं वाटतं.

धर्माला जरी अफूची गोळी म्हटले तरी, त्याच्यात समाज एकसंघ बांधून ठेवण्याची, निम्नस्तरीय गटाला सहाय्य करण्याची बाब त्याच्यात आहे. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी अशा परंपरा सौहार्दाने जपाव्यात, असं मला वाटतं. आणि हो आम्ही या शिमग्याला शिगमो म्हणतो!

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा