You are currently viewing स्त्री..गौरव गाथा

स्त्री..गौरव गाथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

 

*स्त्री..गौरव गाथा*

 

*”ॐ या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।*

*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।”*

स्त्री शक्तीचा आदर, सन्मान करणारा, तिच्यातील दैवी अंशाची पूजा करणारा अर्थात स्त्रीचा गौरव करणारा हा मंत्र…! परंतु, महिला दिनाच्या निमित्ताने केवळ एक दिवस महिलांचे गुणगान गायले, विविध कार्यक्रम घेऊन महिलांना सन्मानित केलं तरी भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री ही अजूनही उपेक्षितच राहिली हे मात्र एक कटू सत्य आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज अनेक संस्था, शाळा, महाविद्यालये अगदी शासकीय कार्यालये महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबवितात, स्पर्धा घेतात, महिलांना शॉल, फेटे घालून गौरवीत करतात… भाषणांमधून त्यांच्या कार्याचे आणि एकंदर जीवनप्रवासाचे गोडवे गातात. परंतु.., तोच मानसन्मान चिरंतर पुरुषांच्या मनात टिकतो का..? तोच आदर महिलांना वेळोवेळी मनापासून मिळतो का..? हे प्रश्न मात्र निरुत्तर राहतात तिथेच महिला दिनाचे औचित्य साधून केलेले कार्यक्रम सोपस्कार होऊन जातात. तरीही महिलादिनाच्या कार्यक्रमाचा उत्साह मात्र एक दिवस का होईना अनेक चेहऱ्यांवर आनंदाची झलक दाखवून देतो हे ही नसे थोडके..!

 

*”यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता”*

म्हणजेच जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथेच देवता वास करतात. स्त्रीला नेहमीच मातृत्व, करुणा आणि शक्तीचे प्रतीक मानले आहे. स्त्री ही आज केवळ घरसंसाराची शोभा, भोगवस्तू, चूल आणि मूल पर्यंत मर्यादित, संसाराची चाके राहिलेली अशा बंधनांमध्ये अडकून राहिलेली नसून राष्ट्र उभारणीत देखील तिने सहभाग नोंदवला आहे. आपली जिद्द, चिकाटी आणि सर्वस्व अर्पण करून झोकून देत काम करण्याची कणखर वृत्ती यामुळे तिने समाजास बदलण्यास भाग पाडले आहे. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात कर्तृत्ववान महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आपण केवळ भारताचा विचार केल्यास शिवबाला शिवराय ते छत्रपती असा दैदिप्यमान प्रवास घडविणाऱ्या जिजाऊंपासून उत्कृष्ट प्रशासन आणि न्यायदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या झाशीच्या राणी अहिल्याबाई होळकर, महाराणी दुर्गावती, “सावित्रीच्या लेकी” अशी सुशिक्षित, सुसंस्कारित, कष्टकरी महिलांना ओळख देणाऱ्या, महिला सक्षमीकरणाचा मूळ मंत्र शिक्षणात आहे हे जाणून स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे ज्ञानाचे विद्यापीठ..! अठराव्या शतकात परदेशात जाऊन वैद्यकीय पदवी घेणाऱ्या आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, पी. टी. उषा, आणि अलीकडील अनेक अनाथ लेकरांची माय झालेल्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, गानसम्राज्ञी लतादीदी, आशादीदी, सुमन कल्याणपूरकर अशा कितीतरी कर्तृत्ववान महिलांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्यातून, विविधांगी कलांमधून आपला ठसा उमटवला असून त्यांचे कार्य आणि जीवनप्रवास यामुळे त्या नव्या पिढीसाठी आदर्श, प्रेरणादायी ठरल्या आहेत.

आज भारताच्या प्राचीन काळातील स्त्री ते आधुनिक काळातील स्त्रियांचा अभ्यास केला असता स्त्रियांना खरी गरज आहे ती पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची समान संधी देण्याची. कारण, जेव्हा त्यांना समान संधी मिळते तेव्हाच त्यांचा आत्मविश्वास बळावतो अन् काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छाशक्ती जागृत होते, त्यातून सकारात्मक असे बदल घडतात. पुरुषप्रधान संस्कृतीची बंधने झुगारून त्या आपली वेगळी ओळख निर्माण करतात. चंद्रावर झेप घेणारी पहिली महिला कल्पना चावला, अंतराळात दीर्घकाळ राहणारी सुनीता विल्यम्स, “भारताची क्षेपणास्त्र महिला” म्हणून ओळख असणारी टेमी थॉमस यांनी विज्ञान आणि अंतराळ सारख्या एका वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. क्रीडा क्षेत्रात धावपटू म्हणून नावलौकिक मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावणारी पी. टी.उषा, बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक जिंकून उज्वल यश संपादन करणारी पी. व्ही. सिंधू, फ्रीस्टाईल कुस्तीपटू साक्षी मलिक, वेटलिफ्टर मीराबाई चानू, क्रिकेटपटू मिताली राज, हरमनप्रित कौर यांनी क्रीडाक्षेत्रात भारताला मानसन्मान मिळवून दिला आहे.

सामाजिक कार्यात आदर्श घ्यावा असे अभिमानास्पद कार्य करणाऱ्या अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ म्हणजे वात्सल्याचा मूर्तिमंत झरा..! जिथे लेकरं आपल्या आई बापाला विसरतात, पोरं असून अनाथांसारखी वागणूक देतात तिथे सिंधूताईंनी शेकडो लेकरांची आई बनून कितीतरी लेकरांना आईची माया दिली, जगण्यासाठी आधार बनल्या, आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण दिले अन् स्वतःच्या पायावर उभे केले. अनाथांसाठी सिंधुताई मायेची सावली बनल्या आणि माणुसकीचे आदर्शवत असे जिवंत उदाहरण ठरल्या. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. राजकारणात स्त्री देखील सक्षम नेतृत्व करू शकते, देश चालवू शकते हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले आहे. बायोकॉन सारखी कंपनी स्थापन करून किरण मुजुमदार शॉ उद्योजिका म्हणून आदर्श ठरल्या तर फाल्गुनी नायर यांनी नायका कंपनीची स्थापना करून यशस्वी उद्योजिका बनण्यात आज स्त्रियाही मागे नाहीत, फक्त काहीतरी करण्याची जिद्द अंगी असावी हे दाखवून दिले आहे.

संरक्षण क्षेत्रातही आता महिला मागे राहिल्या नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांचे जीवन तरुण पिढीला न डगमगता लढण्याचे, प्रतिकूल परिस्थितीत संकटाला सामोरे जाण्याची शिकवण देते. आज महिला राजकारणात, संरक्षण, साहित्य, कला, उद्योग व्यवसाय आदी क्षेत्रात आघाडीवर आहेत. अशा कर्तृत्ववान स्त्रिया जेव्हा स्वतःची क्षमता ओळखून काम करतात तेव्हा त्या केवळ स्वतःची प्रगती करत नाहीत तर समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. *”स्त्री शिकली प्रगती झाली”* ही केवळ घोषणा नसून घरातील एक स्त्री शिकली की, ती संपूर्ण घराला साक्षर करते. त्यासाठी म्हणतात “स्त्री सुशिक्षित झाल्यावर अज्ञानतेचा अंधार मिटेल, साक्षरतेचा प्रकाश पडेल”.

अलीकडे महिला दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था, महिला मंडळे रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लिंबू चमचा शर्यत असे विविध उपक्रम राबवताना दिसतात. पण.., खरोखर महिलांना या स्पर्धांमध्ये विजेते होऊन समाधान मिळते का..? स्त्री ही सुंदरच आहे, रंभा, मेनका, ऐश्वर्या अशी कितीतरी विशेषणे तिला दिली आहेत. तिला नट्टापट्टा करायला आवडतो, चांगले कपडे, साड्या परिधान करायला आवडतात…आणि तिचं सौंदर्य केवळ चेहऱ्यावरील रंगात नसतं…पण, मग तिच्या सौंदर्याची स्पर्धा कशासाठी..? महिलांना रोजच चूल आणि मूल, घरातील जेवणावळी करताना पाककला प्रदर्शन करायचेच असते, सकाळी उठून आंघोळी उरकून प्रथम दारावर रांगोळी काढणे, नाश्ता बनविणे, लिंबू कांदे कापणे हे नित्याचेच न चुकणारे कार्यक्रम असतात. त्यामुळे अशा रोजच्याच जीवनातील स्पर्धा ठेवणे कितपत योग्य..? याचाही विचार आज संस्थांनी, महिला मंडळांनी केला पाहिजे.

महिलांच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर त्यांच्यातील उपजत कलागुण जागृत करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिक उपक्रम मग त्यात काव्य लेखन, सादरीकरण, कथा, लेख लेखन, गायन स्पर्धा आयोजित करणे जेणेकरून त्या मनातील सारं काही शब्दात व्यक्त होऊ शकतात आणि त्यांच्यातील उपजत कला जपली जाऊ शकते. यातून स्त्रियांच्या कलेचा, स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान होऊ शकतो. विविध क्षेत्रातील महिलांना एका मंचावर आणून त्यांच्या यशाचे कौतुक केले पाहिजे, त्यांचे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक योगदान, त्यांच्यातील कला समाजाच्या पुढे आणल्या पाहिजेत. तरच स्त्रीचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे.

नोकरदार स्त्रियांना मानसन्मान मिळतो तेव्हा शेतकरी कष्टकरी स्त्रिया मात्र खेडोपाडी दुर्लक्षित राहतात हा दुजाभाव दूर झाला पाहिजे. कारण पांढरपेशा नोकरी व्यवसाय केला म्हणजे घराच्या आर्थिक जबाबदारीत नोकरदार स्त्रियाच सहभागी होतात असा गैरसमज समाजात दृढ होत चालला आहे. त्यामुळे नोकरीवरून येणारी स्त्री आज मानसन्मानाचे जीवन जगते. कारण ती पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते असे म्हटले जाते. परंतु…., पुरुषाने शेतात नांगरणी केल्यावर बियाणे लावणे, रुजत घालणं, पेरणी जे काही करायचं ते स्त्री करते. एवढेच काय धान्य तयार झाल्यावर कापणी सुद्धा स्त्रिया करतात. पुरुषांच्या बरोबरीने घराचा आर्थिक भार ग्रामीण भागातील स्त्रिया देखील पेलत असतात, साक्षर नसल्या तरी त्या सुसंस्कृत असतात…तरीही शेतकरी, कष्टकरी म्हणून त्या दुर्लक्षित राहतात. कुठेतरी समाजातील ग्रामीण आणि नीम शहरी, शहरी स्त्रियांमधील ही दूरी मिटणे काळाची गरज बनली आहे.

एकवेळ आदराने स्त्रियांच्या पाया पडू नका.. परंतु…, आई, पत्नी, बहीण, मुलगी अशा आयुष्य गुंफलेल्या नाजूक, गोड नात्यांनी आपल्याशी नाळ जुळलेली स्त्री म्हणून स्त्रीचा सन्मान ठेवा.. कारण, स्त्रीला पैसा, संपत्ती यापेक्षा जास्त प्रिय असतो तो तिचा सन्मान..! केवळ महिला दिनी नको, कायम स्त्री सन्माननीय असली पाहिजे..स्त्रीचा सन्मान तोच आपला, आपल्या घराण्याचा सन्मान असतो.

सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व महिलांना महिलादिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

 

🖊️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा