You are currently viewing जगतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

जगतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

जगतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी ‘महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असून जिल्हास्तरीय मोहीम पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कळविले आहे

        जिल्हास्तरीय नियोजन व अंमलबजावणी –केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सिंधुदुर्ग जिल्हयात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (Human Papillomavirus – HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची (Steering Committee) बैठक 05 मार्च, 2026 रोजी जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे हे उपस्थित होते.

        मोहिमेची पार्श्वभूमी आणि उ‌द्दिष्टः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मोहीम एकूण ९० दिवस (तीन महिने) चालणार आहे.

            मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्येः पात्र लाभार्थीः ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांना १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत. अशा सर्व मुली या लसीकरणासाठी पात्र असतील.

लस आणि मात्राःया मोहिमेत ‘Gardasil-4’ (Quadrivalent HPV) ही लस दिली जाईल. लाभार्थ्याला या लसीचा फक्त एकच डोस (०.५ मि.ली.) डाव्या हाताच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिला जाणार आहे.

लसीकरण ठिकाणः ही लस केवळ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये, जसे की आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र), ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असेल. लसीकरणाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० अशी निश्चित करण्यात आली आहे.

            नोंदणी प्रक्रियाः पालकांना आपल्या मुलींची नोंदणी ‘यू-विन’ (U-WIN) पोर्टलवर स्वतः करता येईल किंवा आरोग्य केंद्रावर जाऊन जागीच (Walk-in) नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

        लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणापूर्वी मुर्लीनी आहार घेतलेला असावा, याची खात्री पालकांनी करावी. ही लस अत्यंत सुरक्षित असून लसीकरणानंतर काही वेळ मुलींना आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी शासनाने ‘१०४’ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

        जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींच्या पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून त्यांना भविष्यातील कर्करोगाच्या धोक्यापासून सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा