अद्भुत अनुभुती देणारा झोळंबेचा न्हावण उत्सव
निसर्ग संपन्न झोळंबे गावचा प्रसिद्ध शिमगोत्सव दिनांक ९,१० मार्च २०२६ रोजी संपन्न होत असून बत्तीच्या उजेडात डोक्यावर कळस घेवून भक्ताच्या घरोघरी धावत जाणारा शिवशंभो अर्थात न्हावण उत्सव दिनांक १० मार्च रोजी होत आहे .
झोळंबे शिमगोत्सव ची सुरुवात होळी पौर्णिमेपासून एक महिना अगोदर म्हणजे “माघ पौ्णिमेला” होते, या दिवशी चव्हाट्यावर नारळ ठेऊन देवाला सांगणे केले जाते आणि होळी च्या ठिकाणी जती म्हटल्या जातात आणि येथूनच झोळंबे च्या शिमगोत्सव ची सुरुवात होते.
होळी पौर्णिमे दिवशी सर्व गावकरी मिळून सर्वात प्रथम माऊली मंदिरकडील होळी घालतात आणि त्या नंतर सायंकाळी सर्व गावकरी मिळून ठरलेल्या ठिकाणी गाव होळी आणण्यासाठी जातात. अगदी वाजत गाजत आणि आनंदाने सर्व गावकरी होळी चव्हाट्यावर आणतात, त्यानंतर प्रत्येक जण होळी घालण्याची तयारी करतात. रात्री उशिरा सर्व गावकरी मिळून होळी घालतात. त्या नंतर सर्व गावकरी होळी साठी नैवद्य दाखवता.
होळी पौर्णिमे पासून सातव्या दिवशी गावा बाहेर असलेल्या वाड्या मध्ये काही गावकरी व मानकरी राधे सोबत जातात तर काही गावकरी मानकऱ्यांसोबत रोंबटा सोबत जातात. त्या नंतर आठव्या व्या दिवशी सकाळी झोळंबे गावठाण मध्ये राधा असते. तर सायंकाळी चव्हाट्यावरून देवांच्या खेळ्यांसोबत रोंबाट गावठाण मध्ये जाण्यासाठी निघते. रात्री उशिरापर्यंत हे रोंबाट संपूर्ण गावठाण फिरून पहाटे माणा वर येते. थोडा वेळ विश्रांती घेऊन पहाटे हे रोंबाट चव्हाट्यावर जाते. त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या रीती रिवाजांप्रमाणे रनबाला कार्यक्रम चालू होतो. पहाटे गावात चोर सोडले जातात आणि त्या नंतर चव्हाट्याला पालखी सह प्रदक्षिणा घालत देवाचे रोंबत असते.
९ व्या दिवशी दुपारी होळी वर धूळ मारून सर्व गावकरी संपूर्ण गावात धूळ मारतात. त्या नंतर गावात सर्वत्र साफसफाई करून देवाच्या आगमनाची तयारी केली जाते. सर्व प्रथम न्हावणाचा चा कळस श्री देवी माऊली मंदिराकडे नेला जातो आणि त्या नंतर पूर्वजांनी आखून दिलेल्या मागा मर्यादे प्रमाणे देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन बारा पाचा सह निघतो आणि सर्वात प्रथम चव्हाट्यावर येतो, होळी ला न्हावण घातल्या नंतर प्रमुख मानकरी न्हावण घेतात. आणि त्या नंतर देव कूळ घर आणि प्रमुख मानकऱ्यांच्या घरी जाऊन न्हावण देतो. त्यानंतर संपूर्ण गावठाण करून रात्री १२ च्या सुमारास चव्हाट्यावर येतो, देवाचा कौल मिळाला की माहेरवाशिणी देवाला नारळ अर्पण करून न्हवण घेतात आणि या अद्भूत अशा सोहळ्याची सांगता होते. – ©ओमप्रसाद संदिप गवस (झोळंबे)
