कुडाळ :
कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ व कोमसाप शाखा कुडाळ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा रविवार ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये दुपारी ३.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. आहे. आज सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रातील १७ महिलांचा नारीशक्ती म्हणून सन्मान देऊन गौरव करण्यासाठी निवड करण्यात आली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा सचिव संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, कार्यकारिणी सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषद ही सिंधुदुर्ग राज्यातील एक अग्रगण्य साहित्य संस्था असून या वर्षीपासून साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक ठेवा संवर्धन, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या आदर्श नारी शक्तीचा महिला दिनाच्या निमित्ताने गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर सन्मान सोहळा कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा मंडळ व कोमसाप शाखा कुडाळच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी देसाई असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक नीता राणे व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महिला विभागाच्या प्रमुख सौ.वृंदा कांबळी उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा सचिव संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, सचिव सुरेश पवार यांनी केले आहे
