पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्पात निर्णय
पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी, सूक्ष्म उद्योग व कौशल्य विकासाला चालना; सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला गती
मुंबई (प्रतिनिधी) :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत ‘सिंधुरत्न समृद्ध’ या पथदर्शी योजनेला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असून पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास साधण्यासाठी सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ‘सिंधुरत्न समृद्ध’ ही योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आली होती.
मात्र या योजनेला पुढेही मुदतवाढ मिळावी यासाठी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून पुढील तीन वर्षांसाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत कृषी, फलोत्पादन, पशुधन विकास, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, ग्रामविकास, लहान बंदरांचा विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित सूक्ष्म उद्योग आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हावासीयांकडूनही या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवत सातत्याने पाठपुरावा केला होता. आता या योजनेला मुदतवाढ मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
