You are currently viewing सावंतवाडीत १३ ते १५ मार्चदरम्यान ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ची मेजवानी

सावंतवाडीत १३ ते १५ मार्चदरम्यान ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ची मेजवानी

मळगाव येथे कला-संस्कृती, कोकणी खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा संगम; १३ मार्चला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी :

कोकणातील समृद्ध कला-संस्कृती, निसर्गरम्य पर्यटन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा संगम घडविणारा ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ हा भव्य सोहळा १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील माई इन्स्टिट्यूटच्या परिसरात हा महोत्सव पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांना जागतिक ओळख मिळवून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची पारंपरिक खाद्यसंस्कृती पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत असून यापूर्वी बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकणी महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता मळगाव येथे तीन एकर परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. माई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या माध्यमातून प्रशिक्षित शेफ या महोत्सवात आपल्या पाककलेचे कौशल्य सादर करणार असल्याची माहितीही पंढरी परब यांनी दिली.

महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, १३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

महोत्सवात ‘सिंधू सुंदरी’ फॅशन शो, ‘खेळ पैठणीचा’, कराओके आणि नृत्य स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी ‘मस्ती अँड मॅजिक’ हा विशेष उपक्रम तर गृहिणी आणि तरुणांसाठी ‘मॉकटेल्स, शेक्स, केक्स आणि कुकीज’ तयार करण्याच्या विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवारी ‘देवधून’ लाईव्ह बँडचा परफॉर्मन्स रंगणार असून महोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजे १५ मार्च रोजी राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट हा रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

महोत्सवात उभारण्यात येणाऱ्या भव्य खाद्य जत्रेत कोकणी पदार्थांची मेजवानी अनुभवता येणार आहे. तसेच महिला बचत गट आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी ‘ग्राहक बाजार’ अंतर्गत विशेष स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही विशेष कार्यशाळांसाठी प्रवेश मर्यादित असून इच्छुक नागरिकांनी १२ मार्चपूर्वी नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सिंधुदुर्गातील या सांस्कृतिक महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब, सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक महेश तानावडे, सिनीयर एक्झिक्यूटिव्ह प्रविण प्रभू केळुस्कर, रिजनल मार्केटींग मॅनेजर साक्षी मयेकर, माई इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अनिरुद्ध दास, जयहिंद कॉलेजचे प्राचार्य अमेय महाजन आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा