बिळवस ग्रामपंचायत इमारत ग्रामपंचायतच्या जागेतच उभारा….

बिळवस ग्रामपंचायत इमारत ग्रामपंचायतच्या जागेतच उभारा….

मालवण

बिळवस ग्रामपंचायतीची इमारत ही ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ठिकाणी उभारणे आवश्यक असताना सरपंच मानसी पालव यांनी दुसऱ्या जागी इमारत उभारण्याचा घाट घातला असून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करून बिळवस तंटामुक्ती समिती अध्यक्ष तातू भागले, उपसरपंच सौ. समीक्षा आंगणे यांच्यासह इतर दोन सदस्यांनी याबाबत जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत इमारत उभारणी विषयी तातडीने कार्यालयीन आदेश देत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या जागेबाबत ग्रामसभेत ठराव घेतला असतानाही याच विषयासाठी पुन्हा नव्याने २३ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेली ग्रामसभा प्रशासनाने रद्द करण्याची मागणीही केली आहे. मालवण तालुक्यातील मूळ मसुरे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन बिळवस, आंगणेवाडी व भोगलेवाडी अशी बिळवस ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. सदर ग्रामपंचायतच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून २० लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. ग्रामसभेमध्ये इमारतीसाठी जागेची निश्चिती होऊन जागा सुद्धा ग्रामपंचायतच्या मालकीची घेण्यात आली आहे. परंतु याबाबत शासनाकडे आवश्यक असा प्रस्ताव देण्यासाठी सरपंच मानसी पालव यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निवेदनात तातू भोगले व सौ. समीक्षा भोगले यांनी नमूद केले आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सरपंच मानसी पालव याना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार कारवाई प्रस्तावित करणेबाबत दिलेल्या नोटीस प्रमाणे सादर केलेले स्पष्टीकरण अमान्य केले असून ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणेचा प्रस्ताव सादर करणे व त्या अनुषंगाने दिलेल्या कर्तव्या बाबत कसूर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत असल्याबाबतचे पत्र सरपंच याना २९ जानेवारी रोजी पाठविले आहे. तसेच ग्रामपंचायत बिळवस इमारत बांधण्या करता ग्रामपंचायतीने विषय पत्रिकेवर विषय ठेवून इमारतीच्या जागेचा ठराव केलेला आहे. तत्कालीन सरपंच यांनी खास ग्रामसभा रद्द करण्याची केलेली कृती ही बेकायदेशीर असून अशी कोणतीही तरतूद खास ग्रामसभा रद्द करण्याची ग्राम अधिनियमात नाही. त्यामुळे मौजे भोगलेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ५ पो. ही. नंबर ३७ मधील ३ गुंठे जमीन बक्षिसपत्राने घेतलेला ठराव विधिग्राह्य आहे. याबाबत ठराव रद्द करण्याबाबत ग्रामपंचायत कडून कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे सदरचा ठराव रद्द झाला अशी बाब दिसून येत नसल्याचे सुद्धा या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतच्या मालकीची जमीन गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असताना सुद्धा सरपंच आणि काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे नवीन जागी ग्रामपंचायत बांधण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत २३ रोजी ग्रामसभा सुद्धा सरपंच यांनी जाहीर केली आहे. ग्रामपंचायतच्या ग्रामसभा देवालयात लावू नयेत याबाबत ग्रामस्थांनी सरपंच याना पत्र देऊन सुद्धा सदर ग्रामसभा पुन्हा देवालयात लावण्यात आली आहे. यामुळे महिलांना या ग्रामसभांना सहभागी होताना गैरसोयीचे होत आहे व ग्रामसभेचा मूळ हेतू असफल होत आहे. त्यामुळे सरपंच यांनी घोषित केलेली २३ फेब्रुवारीची ग्रामसभा रद्द करण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक असल्याची मागणी उपसरपंच सौ समीक्षा आंगणे, ग्रामपंचायत सदस्य सौ. चैताली भोगले, संजय सनये, तंटामुक्त समिती अध्यक्ष तातू भोगले व ग्रामस्थ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा