सिंधुरन मॅरेथॉन, सलमान अली म्युझिकल नाईट, स्वच्छता मोहीम व आरोग्य शिबिर होणार
वेंगुर्ले :
कुडाळ-मालवणचे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले येथे १५ ते १७ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी इंडियन आयडल विजेता सलमान अली यांची “सलमान अली नाईट” हा भव्य संगीत कार्यक्रम होणार असून वेंगुर्लेवासीयांसह सिंधुदुर्गवासीयांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरैया फाउंडेशनचे सचिव धनंजय महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले.
स्वरैया फाउंडेशन आयोजित वेंगुर्ले येथील या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला श्री. महाजन यांच्यासह डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेंद्र उबाळे, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, प्रदीप वेंगुर्लेकर, राजू वजराटकर, राकेश सापळे, पंकज शिरसाट, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
“सिंधुरन मॅरेथॉन” चे भव्य आयोजन
रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ले कॅम्प येथून “सिंधुरन मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ऑलिम्पिकला भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या दत्ती चांद यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेता बिंदू दारासिंग हे उपस्थित राहणार आहेत.
या मॅरेथॉन स्पर्धेत नगरपालिका वेंगुर्ले, रोटरी क्लब वेंगुर्ले, लायन्स क्लब वेंगुर्ले, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, जिल्हा शिवसेना तसेच इतर सामाजिक संस्थांचा सहभाग असणार आहे. वेंगा बॉईज आयोजन पाहणार आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रल्हाद मणचेकर यांनी दिली.
३ कि.मी. फन रन व ५ कि.मी. आणि १० कि.मी. टाइम रन स्पर्धा होणार आहे. प्रथम ५ क्रमांकांना तसेच विविध वयोगटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येतील. या रनसाठी ‘गुगल फॉर्म’ https://forms.gle/qDwQqbiZCBm5Kknd� भरून सहभागी होणे अनिवार्य आहे. नोंदणी झाल्यानंतर खाली एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर WhatsApp Group ला जॉईन होता येईल. पुढील सर्व सूचना WhatsApp वर मिळतील.
सहभागी धावक स्पर्धकांना टी-शर्ट, पदक, सर्टिफिकेट, नाश्ता, सेल्फी पॉईंट, झुम्बा डान्स, प्रत्येक २.५ कि.मी. ला हायड्रेशन बूथ असतील. फक्त प्रथम ३०० नोंदणी धारकांना टी-शर्ट व पदक मिळतील. अधिक माहितीसाठी कि. प्रदीप ७४२०८०८४२६ किंवा के. प्रीती ९५०५९२५५६८ यांच्याशी संपर्क साधावा.
सलमान अली म्युझिकल नाईट आणि डान्स शो
स्वरैया फाउंडेशन, आमदार निलेश राणे प्रेमी व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १५ मार्च रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून वेंगुर्ले कॅम्प येथील मैदानावर प्रसिद्ध गायक इंडियन आयडल विजेता सलमान अली यांची म्युझिकल नाईट हा संगीत शो होणार आहे.
सलमान अली यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नव्या-जुन्या गाण्यांचा आस्वाद वेंगुर्लेवासीयांना मिळणार आहे. या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह उपस्थित राहणार आहे, तसेच आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारी नृत्य अभिनेत्री सोनाली राऊत आणि इशा शाह यांची दिलखेचक नृत्ये होणार आहेत.
कांदळवन सफाई स्वच्छता मोहीम
दि. १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून कांदळवन सफाई स्वच्छता मोहीम चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सुनील डुबळे यांनी माहिती दिली.
स्वरैया फाउंडेशन, नगरपरिषद वेंगुर्ले, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, जिल्हा शिवसेना यांच्या सहभागाने ही सफाई मोहीम वेंगुर्ले कांदळवन येथे करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर
तिसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १७ मार्च सकाळी १० ते २ या वेळेत वेंगुर्ले येथे भव्य आरोग्य शिबिर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती रोटरी क्लबचे राजू वजराटकर यांनी दिली.
वेंगुर्ले गाडीअड्डा येथील डॉक्टर उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होणार आहे. स्वरैया फाउंडेशन, नगरपरिषद वेंगुर्ले, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, संजीवनी हॉस्पिटल, जिल्हा शिवसेना यांच्या सहभागाने हे शिबिर होणार आहे. तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
