You are currently viewing विद्यार्थ्यांनी इंटरनेट ऐवजी पुस्तकांकडे वळावे – अशोक बेंडखळे

विद्यार्थ्यांनी इंटरनेट ऐवजी पुस्तकांकडे वळावे – अशोक बेंडखळे

मुंबई (प्रतिनिधी) :

मराठी भाषेला एक हजार वर्षांचा इतिहास आहे, कारण १०१२ मध्ये पहिला शिलालेख अक्षी येथे सापडला. मराठीचे प्राचीन, मध्य व अर्वाचीन असे तीन कालखंड आहेत. मराठी वाड्मयाची सुरुवात तेराव्या शतकात झाली, त्याचे श्रेय महानुभाव व वारकरी या पंथांना जाते. लीळाचरित्र हा पहिला गद्य ग्रंथ होय (1278). ब्रिटिशानी आपल्याला व्याकरण, पाठ्यपुस्तके व शब्दकोश दिले.”असे उद्गगार प्रसिद्ध साहित्यिक, संपादक अशोक बेंडखळे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय दादर यांच्यावतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले. प्रारंभी साहित्यिक, कवी वि.वा.तथा तात्या शिरवाडकर यांच्या प्रतिमेला साहित्यिक अशोक बेंडखळे, समारंभाचे अध्यक्ष साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, कार्यवाह भरत राऊत, कोषाध्यक्ष सध्या जांभळे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. श्री.अशोक बेंडखळे पुढे म्हणाले की, ओवी, अभंग ही मराठी काव्याची अस्सल रुपे संतानी आपल्याला दिली. लीळाचरित्र ज्ञानेश्वरी,तुकोबाची गाथा, गावगाडा हे मौलिक ग्रंथ आहेत. इंटरनेट माहिती देते तर पुस्तके ज्ञान देतात तेव्हा विद्यार्थ्यानी पुस्तकांकडे वळायला हवे.”जेष्ठपत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली. पण मराठी भाषा गौरवदिन हा एक दिवसाचा सोहळा म्हणून न पाहता प्रत्येकांनी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे असे मत व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष तथा समारंभाचे अध्यक्ष साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे यांनी अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करून सदर उपक्रम आपल्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे असे विषद केले. कार्यवाह भरत राऊत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अभ्यासिकेत वकील आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी येत असलेले विद्यार्थी अँड सुरेश आडिवरेकर आणि पूनम गवादे यांना साहित्यिक संपादक अशोक बेंडखळे यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कोषाध्यक्ष सध्या जांभळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वाचकप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा