You are currently viewing दिपक केसरकर…लोकसभा की विधानसभा लढवणार…?

दिपक केसरकर…लोकसभा की विधानसभा लढवणार…?

*गणेशोत्सवात केसरकर यांचीच सर्वाधिक चर्चा*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण गेली अडीच दशके केवळ दोन व्यक्तींच्याच भोवती फिरत आहे..ते म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर…!

सहकारी ते कट्टर विरोधक अशा भूमिकेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने राणे व दीपक केसरकर या द्वयींकडे पाहिले आहे. परंतु जसजसे महाराष्ट्रातील राजकारण वळण घेत राहिले तसतसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण देखील बदलले. एकेकाळी “विळ्या-भोपळ्याचे नाते” असलेले नारायण राणे व दीपक केसरकर या दोघांमध्ये दिलजमाई होताना दिसून आली. परंतु राणे,केसरकर एकत्र आले तर सावंतवाडी विधानसभा लढण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेले माजी.आमदार राजन तेली काय करणार..?? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे.

शिवसेना पक्ष फुटी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे गेली अनेक वर्षे सेना-भाजप युती असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची लोकसभेची जागा शिवसेना पक्ष लढवत असून यावेळी भाजपसोबत युती असलेले शिवसेना शिंदेगट लोकसभेची सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा आपल्याकडे राखतील काय..?

हा पहिला प्रश्न उपस्थित होत असून जर राखली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढविणार..??

असाही दुसरा प्रश्न उपस्थित होत आहे. गेले काही महिने लोकसभेसाठी किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव राजकीय गोटात चर्चिले जात होते, परंतु अलीकडेच या जागेसाठी दीपक केसरकर यांचे नाव देखील अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे दीपक केसरकर लोकसभा लढविणार की विधानसभा..?? हा प्रश्न गणेशोत्सव काळात अनेकांच्या बैठकीमधील प्रमुख विषय बनला होता. गणेशोत्सव काळात दीपक केसरकर यांची चर्चा अधिक होताना दिसून आली. बदलत्या राजकीय परिस्थितीत केसरकर भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन लोकसभा लढवतील असाही विचार पुढे येत आहे. परंतु देवगड येथून भाजपाचे नितेश राणे, कुडाळ येथून माजी खासदार निलेश राणे या दोन बंधूंनी विधानसभा निवडणूक लढविली तर सावंतवाडीच्या जागेसाठी शिवसेना शिंदेगटाचे दीपक केसरकर हेच प्रबळ दावेदार असतील यात तीळ मात्र शंका नाही. दीपक केसरकर यांचे नाव युतीच्या सरकारकडून जाहीर झाल्यास सावंतवाडी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी गेली काही वर्षे इच्छुक असलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी दीपक केसरकरांना निवडणुकीत सर्वतोपरी मदत करण्याचे सुतोवाच केले आहे. दीपक केसरकर यांच्या विरोधात दोन वेळा सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी मात्र आपण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रतिपादन अनेक वेळा केले आहे. केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीतून निवडणूक लढविण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले माजी आमदार राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर कितीतरी वेळा शब्दांचे आसूड ओढले आहेत. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा लढविली तर राजन तेली यांची भूमिका काय असणार..?? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सावंतवाडीतून विधानसभेचा उमेदवार म्हणून राजन तेली यांनी दोन वेळा निवडणूक लढविली परंतु विरोधकांकडून राजन तेली हे सावंतवाडी शहरातील रहिवासी नसून ते कणकवलीकर आहेत. अशा प्रकारची टीका होत राहिली त्यामुळे राजन तेली यांनी सावंतवाडी शहरात स्वतःचे घरकुल उभे केले आणि यावेळी सावंतवाडीकर म्हणून निवडणुकीसाठी सामोरे जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. राजन तेली यांनी सावंतवाडी घर उभे करून सावंतवाडीचे रहिवासी झाले तरी सावंतवाडीकर त्यांना किती स्वीकारतात..? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली व नारायण राणे यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग आहे. मागील निवडणुकीत राजन तेली यांच्या मागे नारायण राणे यांची ताकद होती परंतु यावेळी सावंतवाडीतून युतीचे उमेदवार म्हणून जर दीपक केसरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर नारायण राणे यांना युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, त्याचप्रमाणे कुडाळ येथून निलेश राणे यांच्या प्रचारासाठी देखील दीपक केसरकर यांची मदत नारायण राणे यांना घ्यावी लागणार आहे, त्यामुळे राजन तेली यांना राणे यांचे किती सहकार्य लाभते यावर तेली यांचे विजयाचे गणित जुळणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली असता तीन पक्षांचे युतीचे सरकार महाराष्ट्रात असून देखील सरकारमध्ये म्हणावा तसा सलोखा दिसून येत नाही. राष्ट्रवादीकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नव्हते त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटातील आमदार मंत्री नाराज होते. त्यांची नाराजी लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांची पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण काम पाहत असून पुढील भवितव्याच्या दृष्टीने उबाठा शिवसेनेचे वर्चस्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कमी करण्यासाठी दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन राणे-केसरकर यांच्या ताकदीवर उबाठा सेना जिल्ह्यातून संपविण्याचा डाव देखील भाजपकडून खेळला जाऊ शकतो. एकंदरीत भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले वर्चस्व राखायचे असेल तर सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना बळ देण्यावाचून पर्याय उरणार नाही. दीपक केसरकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात असलेले महत्त्व आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केसरकर यांना आतापर्यंत मिळालेली ताकद यामुळे केसरकर भविष्यात शिंदे गटाकडून युतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतात की विधानसभा..?? हा प्रश्न गणेशोत्सवादरम्यान अनेकांच्या मुखी चघळला जात होता. त्यामुळे दीपक केसरकर चाकरमान्यांसह गाववाल्यांच्या चर्चेत प्राधान्याने दिसून येत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा