सावंतवाडीत ‘घे भरारी फाउंडेशन’तर्फे महिनाभर मोफत झुंबा क्लास;
९ मार्चला महिला दिन सोहळा
सावंतवाडी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनच्या वतीने महिला आणि युवतींच्या सुदृढ आरोग्यासाठी १ ते ३१ मार्च या कालावधीत महिनाभर मोफत झुंबा क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, ९ मार्च रोजी शिव उद्यान येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला महिला दिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने १ मार्चपासून काझी शहाबुद्दीन हॉल येथे झुंबा वर्गांना सुरुवात होत आहे. दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार असून मार्च महिनाभर कोणतीही फी आकारली जाणार नाही. परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शिव उद्यान येथे महिला दिनाचा मुख्य सोहळा रंगणार आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी आकर्षक स्पॉट प्राईजेस, लकी ड्रॉ, गाणी-नृत्यांचे सादरीकरण अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘घे भरारी’च्या महिला सदस्यांकडून सादर केला जाणारा दशावतारी नाट्यप्रयोग होय.
या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्यकारी अध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी आणि खजिनदार स्वप्नाली कारेकर यांनी केले आहे.
