You are currently viewing सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*स्वातंत्र्यवीर सावरकर* 

*सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर* 

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम…

साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. आज २६ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन…

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष… महाभारतात कृष्णाने सांगितलेली गीता सावरकर जगले गीता खरोखरचं कोण जगले असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच होय..

या थोर राष्ट्रपुरुषाने आपले अवघे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले आणि तेही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता…. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार,

कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते.

सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली.म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुस-या साहित्यिकाचा केलेला तो गौरव…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी,

निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकाविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका होय सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळ्या कोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर महाकाव्य लिहिणारे हे जगातील एकमेव महाकवी आहेत. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्टये आहेत. सुस्पष्ट विचार तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांची बलस्थाने.

सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझलाही लिहिल्या होत्या…. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला..

सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषा शुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. मराठी भाषेत पूर्वी अन्य भाषांमधील शब्दांचा वापर होत होता. तो त्यांनी थांबवून चपखल असे मराठी शब्द दिले. हे योगदान फार महत्त्वाचे.. यामध्ये क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान, नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्ती वेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे अनेक शब्द मराठी भाषेत सावरकरांनी तयार केलेले आहेत…

सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, माझी जन्मठेप, सहा सोनेरे पाने ही पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल ठेवाच…!!

सावरकरांचे नाव घेतले की “ने मजसी ने” हे आर्त गीत व स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र- ‘”जयोस्तुते” हे आठवल्यावाचून राहात नाहीत.

“ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला” ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.

ज्यांची लेखणी नेहमीच आदरणीय आणि वंदनीय… असामान्य व्यक्तिमत्व आणि कर्तृत्ववान देशभक्त आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर…

स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ देशभक्त नव्हते तर द्रष्टे समाजसुधारक ही होते. त्यांच्या ठाई अमोघ वकृत्व आणि महाकवीची प्रतिभा विलासात होती तसेच आत्मचरित्रकार आणि नाटककार म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला…

भाषा व लिपी शुद्धी यांचे ते अभिमानी होते तसेच ते हिंदुत्वाचे, हिंदू राष्ट्रवादाचे कडवे पुरस्कर्ते होते.. प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, विज्ञानधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असे ते म्हणत असतं

चळवळीच्या धकाधकीत आणि अंदमानातील यातनामय, उपेक्षित व एकाकी जीवनात त्यांना साथ दिली व जगण्याचे लढण्याचे बळ दिले ते त्यांच्या कवितेने… !!

त्यांची एकषष्ठी, पंचाहत्तरी जनतेने मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरी केली. त्याच वेळी या महापुरुषाच्या मनात आत्मसमर्पणाचे विचार येवू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी औषधपाणी, अन्न आणि शेवटी पाणी घेणेही थांबवले. अखेरीस २६ फेबृवारी १९६६ रोजी त्यांनी जराजीर्ण देह काळाच्या स्वाधीन केला…

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दुःखद निधनानंतर “दैनिक मराठा” मधे आचार्य अत्रे यांनी सावरकर यांच्या देदीप्यमान कारकीर्दीबद्दल अणि कार्याबद्दल चौदा लेख लिहिले होते…

मृत्यूच्या माथी पाय देवून ते अशाश्वतातून  शाश्वतात विलीन झाले आणि एक धगधगते अग्निकुंड कायमचे थंड झाले…

सावरकरांना विनम्र अभिवादन.. !!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी-

ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा