७ मार्च ते २० मे दरम्यान १० मंडळांत विशेष शिबिरे; नागरिकांना १५ सेवा एकाच ठिकाणी
कुडाळ :
कुडाळ तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान (टप्पा-२) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही शिबिरे ७ मार्च ते २० मे २०२६ या कालावधीत १० मंडळांत आयोजित केली जाणार असल्याची माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे तसेच कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच ग्रामस्थांना महसूल विभागाच्या विविध १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, तुकडेबंदी कायद्यान्वये प्रकरणांचा निपटारा, ई-मोजणी अर्ज, AgriStack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग २ ते वर्ग १ रूपांतरण, भूसंपादन तसेच अकृषिक परवानगीसंदर्भातील विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक
वालावल मंडळ – ०७ मार्च २०२६
कसाल मंडळ – १४ मार्च २०२६
गोंदेस मंडळ – २५ मार्च २०२६
ओरोस बुद्रुक मंडळ – १० एप्रिल २०२६
कडावल मंडळ – १७ एप्रिल २०२६
पिंगुळी मंडळ – २४ एप्रिल २०२६
झाराप मंडळ – ३० एप्रिल २०२६
कुडाळ मंडळ – ०८ मे २०२६
माणगाव मंडळ – १५ मे २०२६
मडगाव (माझगावी) मंडळ – २० मे २०२६
संबंधित मंडळ स्तरावर आयोजित शिबिरांना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
