You are currently viewing गाळेल, डिंगणे परिसराला चक्रीवादळाचा फटका

गाळेल, डिंगणे परिसराला चक्रीवादळाचा फटका

लाखो रुपयांचे नुकसान

बांदा

शुक्रवारी रात्री उशिरा गाळेल, डिंगणे, डोंगरपाल परिसराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. वादळी वारा व मेघगर्जनेसह तब्बल १ तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने काजू, सुपारी, आंबा, माड झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली. काजू हंगामाच्या तोंडावरच बी गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. कृषी विभाग वगळता महसूल प्रशासनाचे अधिकारी शनिवारी पंचनामा करण्यासाठी न फिरकल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. तब्बल एक तास पाऊस सुरू होता. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गाळेल गावाला बसला. गाळेल-मधलीवाडी येथील शेतकरी प्रवीण अनंत नाडकर्णी यांच्या आंबा, काजू बागायतीचे सर्वाधिक नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांवर नैसर्गिक आस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी नाडकर्णी यांच्या काजू बागायतीतील झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात काजू बी ची गळ झाली आहे. त्याचबरोबर सुपारी, माड, आंबा झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे. नाडकर्णी यांच्या बागेतील जाम, पपई झाडे देखील वादळी वाऱ्यात उन्मळून पडल्याने नुकसानी झाली आहे. सकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याची कल्पना महसूल व कृषी विभागाला दिली होती. मात्र दिवसभरात कृषी सहाय्यक अतुल माळी यांनी गाळेल येथे येऊन नुकसानग्रस्त झाडांची पाहणी केली. दिवसभरात महसूल विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी याठिकाणी फिरकला नाही.

माड, सुपारी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. दोन्ही गावात अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील काजू पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 11 =