इन्सुलीतील तिलारी कालवा प्रकल्पाच्या पाइपांना आग; जीवितहानी टळली
बांदा (प्रतिनिधी) –
इन्सुली येथील तिलारी कालवा प्रकल्पांतर्गत कॅनॉल बांधकामासाठी ठेकेदाराने डंप करून ठेवलेल्या पाइपांना आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने मोठा भडका घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत काही पाइपांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.
