You are currently viewing बांधकामाधीन पुलाला डंपरची धडक

बांधकामाधीन पुलाला डंपरची धडक

बांधकामाधीन पुलाला डंपरची धडक

इन्सुली येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामादरम्यान घटना

सुरक्षिततेबाबत कडक सूचना, ठेकेदाराला जबाबदारीचा इशारा –

जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांचा आक्रमक पवित्रा;

बांदा  :

इन्सुली सुतगिरणी–माडभाकर कोठावळे बांध या मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. इन्सुली येथील डांबर प्लांटवरून जाणाऱ्या डंपरने बांधकाम सुरू असलेल्या पुलाला जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही; मात्र या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी संबंधित ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले तसेच कामाच्या ठिकाणी तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता श्री. भोसले यांच्याशी संपर्क साधून रस्त्याची सविस्तर तपासणी करण्यासही सांगितले.
काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे सुरक्षित करावा, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व इशारे लावावेत, अशी मागणी राऊळ यांनी केली. या मार्गावरून मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी प्रवास करतात आणि रस्त्यालगत मोठी विहीर असल्याने भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे अशा प्रकारची घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदारावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, डांबर प्लांटचे मालक रोहित नाडकर्णी यांनी संबंधित चालकाला दोन दिवसांपूर्वीच कामावरून कमी केल्याचा दावा केला. यावर राऊळ यांनी प्रश्न उपस्थित करत, “जर चालकाला कामावरून काढले होते, तर तो डंपर घेऊन तेथे कसा पोहोचला? अपघात झाला असता तर जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल केला.
अपघातानंतर क्रेनच्या मदतीने डंपर हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, माजी पदाधिकारी आणि ठेकेदारांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा