कणकवलीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिंधुताई सपकाळ यांची भव्य प्रतिकृती साकारली जाणार – डॉ. विद्याधर तायशेटे
कणकवली :
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल व सोमस्थ अकादमी, वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती तब्बल २०० टॉवेल व ३०० साड्यांच्या माध्यमातून उभी केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे आणि संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे यांनी दिली.
संजीवनी हॉस्पिटल, कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष बुलंद पटेल आणि सहसचिव निलेश महिंद्रकर उपस्थित होते.
प्रा. भिसे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची आणि सामाजिक भावना विकसित व्हावी या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्था विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. गेल्या तीन वर्षांत विशेष उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या महापुरुषांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षी १००० वाद्यांच्या साहाय्याने भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्यानंतर ब्लँकेटच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांची प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच घड्याळांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
यावर्षी ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या चित्रकृती साड्या व टॉवेल यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी वापरण्यात आलेल्या साड्या व टॉवेल्स नंतर वृद्धाश्रमाला मोफत देण्यात येणार आहेत.
डॉ. विद्याधर तायशेटे यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तसेच सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
