You are currently viewing कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजहितासाठी व्हावा – डॉ. भालचंद्र मुणगेकर
Oplus_16908288

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजहितासाठी व्हावा – डॉ. भालचंद्र मुणगेकर

एमआयटीएम सुकळवाड येथे पदवीदान सोहळा; अपयशाने खचू नका, जिद्दीने पुढे जा असा विद्यार्थ्यांना संदेश

मालवण :

तंत्रज्ञान विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव झपाट्याने वाढत असून, ज्या माहितीसाठी पूर्वी आठ दिवस लागायचे ती माहिती आता अवघ्या १५ मिनिटांत उपलब्ध होत आहे. हे तंत्रज्ञान जितके फायद्याचे आहे तितकेच रोजगाराच्या दृष्टीने आव्हानात्मकही ठरू शकते. त्यामुळे विज्ञानातील या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करायचा की तोट्यासाठी, याचा गांभीर्याने विचार राज्यकर्ते आणि वैज्ञानिकांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

सुकळवाड (ता. मालवण) येथील जयंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम (इंजिनिअरिंग कॉलेज)चा पदवीदान सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल होते. या प्रसंगी माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे, ॲड. महेश सरनोबत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मुणगेकर यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत कुलगुरू आणि राज्यसभा खासदारापर्यंतचा प्रवास केला, असे त्यांनी सांगितले. इंटरच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ज्या राजाबाई टॉवरखाली मी रडलो होतो, त्याच विद्यापीठाचा पुढे कुलगुरू झालो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा सल्ला दिला. पदवी मिळाल्यानंतर नम्रता बाळगावी आणि समाजातील उपेक्षित घटकांविषयी सहानुभूती ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संतोष पाल यांचे कौतुक केले.

संतोष पाल यांनी आपल्या भाषणात एआय हेही आजच्या काळातील एक मोठे आव्हान असल्याचे सांगितले. मात्र, मनुष्य भावनेच्या आधारे कार्य करत असल्याने तो एआयपेक्षा नेहमीच श्रेष्ठ राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर समाधान न मानता जबाबदारी स्वीकारावी आणि स्टार्टअपसारख्या नव्या क्षेत्रात संधी शोधाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाच्या यशात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकारी संचालकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून न्यायाधीश होण्याचा आपला प्रवास सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. पालकांनी तुम्हाला तळ्यापर्यंत आणले आहे, आता पुढे पोहण्याची जबाबदारी तुमची आहे, असे त्यांनी सांगितले. अशोक सावंत यांनी गेल्या १५ वर्षांत या कॉलेजमधून पाच हजारांहून अधिक विद्यार्थी घडल्याचे सांगितले. त्यातील अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले असून त्यांचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी एमआयटीएममधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळत असल्याचे सांगितले.

या सोहळ्यास प्रा. गौतम मुणगेकर, राकेश सावंत, उपप्राचार्य प्रा. विशाल कुशे, प्रा. पूनम कदम, प्रा. रोशनी वरक, प्रा. जानकी पावसकर, प्रा. संजय कुशे, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा. सिद्धेश शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा