*रेडी किल्ले यशवंतगड येथे गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा*
रेडी
रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड)व समस्त शिवप्रेमींच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सव रेडी येथील ऐतिहासिक राज्यसंरक्षित स्मारक असलेल्या यशवंतगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त सकाळी ०८.३० वाजता रेडी ग्रामपंचायत येथून पूजन करुन किल्ले यशवंतगड येथे शिवप्रतिमा व पालखी गडाच्या पायथ्याकडून पालखी व शिवप्रतिमेवर फुलांची उधळण व जयघोष करीत ९.०० वाजता किल्ले यशवंतगड येथे पूजनस्थळी पोहोचली . त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक पुरोहित श्री.जोशी यांनी मूर्तीपूजन व ध्वज पूजन करून १०.३० वाजता शिववंदना,ध्येयमंत्र,प्रेरणा मंत्र होऊन सर्व रयतेसाठी शिवपूजनाची सुरुवात झाली. ११.०० वाजता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा तीन गटांमध्ये सुरु झाली. दुपारी १.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये इयत्ता पहिली ते चौथी साठी पक्षी, प्राणी, विदूषक विषयावर चित्रीकरणामध्ये प्रथम पारितोषिकचा मानकरी ध्रुवी चंदन गोसावी, द्वितीय क्रमांक रामनाथ मेस्त्री व तृतीय क्रमांक पांडुरंग राजेंद्र गवस यांनी पटकावला. सर्व लहान गटातील विजेत्यांना कै.सौ. इंद्रायणी रवींद्र भगत यांच्या स्मरणार्थ सौ. अनिता वासुदेव भगत यांच्याकडून पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले होते.
दुसऱ्या गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी साठी ग्रामीण जीवन(उदा. शेतकरी)ह्या विषयासाठी प्रथम क्रमांकाची मानकरी ग्रीष्मा दयानंद लोणे,द्वितीय वैभव महादेव कांबळी व तृतीय नंदन गिरीश पिंगुळकर यांनी पटकवला. सर्व विजेत्यांना लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी ह्या संस्थेकडून बक्षीस पुरस्कृत करण्यात आले होते.
तिसऱ्या गटामध्ये इयत्ता आठवी ते पंधरावी साठी महाराष्ट्रातील गडकिल्ले, हिंदू ऐतिहासिक स्थळे, वास्तू ह्या विषयासाठी प्रथम पारितोषिक गोविंदाग्रज नितीन पोखरे,द्वितीय दत्तराज विनोद टेमकर तर तृतीय आयुष देवेंद्र मांजरेकर यांनी पटकवला. सर्व पारितोषिक रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,रेडी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती. तसेच तिन्ही गटातील सर्व विजेत्यांना आकर्षक चषक हे श्री चंद्रकांत सुरबा केदार, रेडी,बोंबडोजीची वाडी (मुंबई) यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते.स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र संस्थेच्या वतीने देण्यात आले. सदर स्पर्धेसाठी कलाक्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक जे. जे.स्कुल ऑफ आर्टस् मधून जे डी आर्ट पदवी प्राप्त, सतत चार वेळा महाराष्ट्रातून प्रथम व महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार व गोल्ड मेडल मा. राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित श्री.दीपक बापूराव गावडे यांच्यासोबत जगप्रसिद्ध मूर्तिकार कै.श्री.राम सुतार सर यांचे शिष्य,वाळू शिल्प आंतरराष्ट्रीय मध्ये महाराष्ट्रातून निवड झालेले वाळू शिल्पकार तथा चित्रकार श्री. रविराज चिपकर, जे डी आर्ट, 3D ऍनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स डिप्लोमा मध्ये कार्यरत रेडी येथील मूर्तिकार व चित्रकार श्री.भूषण वारखंडकर यांनी परीक्षण व मार्गदर्शन केले.सदर स्पर्धेत १४४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी कडून यशवंतगडावर सिंधुदुर्गातील २२ गड-कोट दुर्गाचे व ऐतिहासिक आरमारातील जहाजाची छायाचित्रे व इतिहासाची साधने ह्या संघटनेच्या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत शस्त्र व गडकोटांची, इतिहासाची माहिती उपस्थिताना मिळावी ह्या उद्देशाने छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.
तरी या उत्सवात उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी आर्थिक व वस्तुरूप व कार्यरूप मदत करून, तसेच ज्या ज्या शाळां, महाविद्यालय यांनी सहभाग घेतला त्या सर्व शाळांचे, पालकांचे,शिक्षकांचे सदर शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात सहकार्य केल्याबद्दल सर्व दात्यांचे, दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी(शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने खुप खुप आभार मानण्यात आले.
