संपादकीय…..
होय, ही म्हण खरी आहे हे दिसते ते कुडाळ एमआयडीसी येथील आठ वर्षांचा दुसरी शिकलेला मुलगा द्विगवेश धर्मेंद्र सुतार याच्या कौशल्याकडे पाहिल्यावर. आताच कुठे प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असणारा हा अवघ्या आठ वर्षांचा मुलगा कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने वळला तो आपले आजोबा श्री सुरेश सुतार यांनी उभी केलेल्या एस.एस.प्लास्टिक इंडस्ट्रीतील प्लास्टिक सामान बनविणाऱ्या मशीनरिंकडे.
श्री.सुरेश सुतार यांनी कुडाळ एमआयडीसी येथे २००५ सालापासून एस एस प्लास्टिक नावाने प्लास्टिक इंडस्ट्री सुरू केली. यशाच्या शिखरावर गेलेला हा व्यवसाय सुरेश सुतार कुटुंबीय उत्तमरीत्या सांभाळत आहेत. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने त्यांचा दुसरीत शिकणारा नातू द्विगवेश धर्मेंद्र सुतार हा देखील एवढ्या लहान वयात प्लास्टिक इंडस्ट्रीज मधील मशिनरी, त्यांची कामे, त्या कशा हाताळायच्या, कामगार काम करतात का, कोणी किती काम केले इथं पासून ट्रान्सपोर्ट ला जाणारे मटेरियल सुद्धा तो न्याहाळू लागला. वर्षभर इंडस्ट्रीज मध्ये वेगवेगळ्या मशिनरी चालविण्यापासून मोल्ड कसे बनतात, मॅन्युअल मशीन कशी चालवायची इत्यादी उत्तमरीत्या शिकला. ज्या वयात मुले खेळ आणि मोबाईल मध्ये व्यस्त असतात त्या वयात द्विगवेश मात्र मशीनच्या प्रेमात पडला आणि मोठा होऊन आपणही मोठ्ठा उद्योगपती होणार ही स्वप्न पाहू लागला.
एवढ्या छोट्याशा वयात द्विगवेश इंडस्ट्रीज मध्ये येणाऱ्या लोकांना मशीनवर काय कामं होतात, ती कशी चालते. त्यातून काय काय उत्पादन होते हे देखील प्रात्यक्षिकासह दाखवत असतो. त्याच्या आजोबांना त्याच्या बाबत विचारले असता ते सांगतात, “द्विगवेशला मोठ्ठा उद्योगपती बनायचे आहे, आपणही एक प्लास्टिक इंडस्ट्री सुरू करून त्यात ऑटोमॅटिक मशीन बसवायच्या आहेत. आपण स्वतः देखील त्याला सर्व काम दाखवून पुढे नेत असतो, आणि आजोबा म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे”. द्विगवेशला विचारले असता तो देखील आपल्या भावी आयुष्याबद्दल खूप काही बोलून जातो. मोठा होऊन आपण सर्व मशीन शिकणार, इंजिनिअर होणार आणि एक मोठ्ठी प्लास्टिक इंडस्ट्री टाकणार.
वयाच्या आठव्या वर्षी गगनभरारी घेण्याची स्वप्ने पाहणे म्हणजे साधेसुधे काम नव्हे, परंतु ती स्वप्नं पाहताना मनात असणारा ठाम विश्वास पाहिला असता, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. याची मात्र प्रचिती येते.