मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील ३३ व्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवत इतिहास घडवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दीपेंद्रसिंह ऐरीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर नेपाळने १७१ धावांचे लक्ष्य अवघ्या १९.२ षटकांत पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या नेपाळने सुरुवातीपासूनच अचूक मारा करत स्कॉटलंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. मायकेल जोन्सने ४५ चेंडूंमध्ये ७१ धावांची झुंजार खेळी केली. ब्रँडन मॅकमुलनने २५ आणि जॉर्ज मन्सीने २७ धावांची साथ दिली. मात्र सोमपाल कामीच्या भेदक गोलंदाजीमुळे स्कॉटलंडचा डाव २० षटकांत ७ गडी गमावून १७० धावांवर रोखला गेला. कामीने ४ षटकांत २५ धावांत ३ गडी बाद केले. नंदन यादवने २ गडी घेत महत्त्वाची साथ दिली.
१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवात सावध राहिली. कुशल भुर्तेलने ३५ चेंडूंमध्ये ४३ धावांची संयमी खेळी केली. आसिफ शेखने ३३ धावांची उपयुक्त भर घातली. कर्णधार रोहित पौडेल १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपेंद्रसिंह ऐरी मैदानात उतरला आणि सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली.
ऐरीने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांची स्फोटक खेळी साकारली. गुलशन झाने १७ चेंडूंमध्ये नाबाद २४ धावा करत त्याला समर्थ साथ दिली. या दमदार भागीदारीमुळे नेपाळने १९.२ षटकांतच विजय निश्चित केला.
या विजयाने वानखेडे स्टेडियमवर नेपाळी चाहत्यांनी जल्लोष केला. सामना संपताच संपूर्ण नेपाळ संघाने मैदानाभोवती विजय फेरी काढली. हजारो नेपाळी समर्थकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सामन्यानंतर कर्णधार रोहित पौडेल म्हणाला, “हा विजय माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. कर्णधार म्हणून हा माझा दुसरा विश्वचषक आहे. या स्पर्धेतील पहिला विजय अखेरच्या साखळी सामन्यात मिळाला, ही बाब खूप समाधान देणारी आहे. ऐरीची खेळी अविश्वसनीय होती. दबावात संयम राखून त्याने सामना जिंकून दिला.”
तो पुढे म्हणाला, “इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवातून आम्ही खूप काही शिकलो. अखेरच्या पाच षटकांत संयम राखणे किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला उमगले. आज त्याचा मोठा फायदा झाला. प्रेक्षकांचा पाठिंबा अविस्मरणीय होता.”
सामनावीर पुरस्कार दीपेंद्रसिंह ऐरीला देण्यात आला. त्याच्या या खेळीमुळे नेपाळने टी–२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेचा शेवट दिमाखदार विजयाने केला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद ठळकपणे अधोरेखित केली आहे.
