फोंडाघाटमध्ये स्वामी समर्थ पालखीचे भक्तिभावात स्वागत;
गाव दुमदुमले जयघोषात
फोंडाघाट
फोंडाघाट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र पालखीचे आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले. पालखीची मिरवणूक गावातील प्रमुख मंदिरांना भेट देत पार पडली. सुरुवातीला पालखी श्री मारुती मंदिर येथे दाखल झाली. त्यानंतर श्री राधाकृष्ण मंदिर व श्री साईबाबा मंदिर येथे परिक्रमा करण्यात आली.
यानंतर पालखी श्री कृष्णा राणे, हवेलीनगर येथे पोहोचली. येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर पालखी श्री स्वामी समर्थ मंदिर मठ डांबरे येथे मुक्कामासाठी रवाना होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बाजारपेठ व पेठ परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गाव स्वामीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पालखीचे दर्शन घेऊन नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. ढोल पथकांच्या गजराने आणि जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
