फोंडाघाट पूल कोसळल्यानंतरही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू; गंभीर अपघाताची शक्यता
फोंडाघाट
फोंडाघाट येथील पूल कोसळून बंद करण्यात आला असून सध्या बाजूने नदीतून तात्पुरता ड्राइव्हर्शन मार्ग तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने या मार्गावरून मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी काही मोठे ट्रक या मार्गावरून सोडले जात असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.
रात्री मोठ्या ट्रकांना प्रवेश?
स्थानिकांचा आरोप आहे की, काही ठेकेदारांकडून पैसे घेऊन मोठ्या वाहनांना रात्रीच्या वेळी मार्ग मोकळा करून दिला जातो. पुढे चेकपोस्ट असतानाही ही वाहतूक कशी सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासन आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी
घटनास्थळी समोरच ग्रामपंचायत कार्यालय असूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. केवळ सूचना फलक लावून जबाबदारी संपत नाही; प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कडक नियंत्रण आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.
पालकमंत्र्यांच्या कानावर बाब
या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी होत आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याची मागणी
मोठ्या वाहनांची वाहतूक बावडाघाट मार्गे वळवावी आणि फोंडाघाट मार्ग केवळ लहान वाहनांसाठीच खुला ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिस यंत्रणेने त्वरित कारवाई करून संभाव्य अपघात टाळावा, अशी नागरिकांची विनंती आहे.

