मुंबई:
सावंतवाडीचे सुपुत्र लेखक, दिग्दर्शक, नाटककार, चतुरस्त्र रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांना विनायक पाटील स्मृती मंच मुंबईचा नाट्यव्रती अनंत घोगळे पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी दिवंगत नाटककार विनायक पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनायक पाटील स्मृती मंचच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो. मुंबईतील नाट्यक्षेत्रात आजवर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून चतुरस्त्र रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांना नाट्यव्रती अनंत घोगळे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदरचा पुरस्कार गुरुवार दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी काशिनाथ धुरू हॉल, ३ छबिलदास रोड, दादर (पश्चिम) मुंबई २८ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे असे विनायक पाटील स्मृती मंचचे प्रमुख कार्यवाह श्री रवींद्रनाथ पारकर यांनी कळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून नाट्यक्षेत्रात पदार्पण केलेल्या श्रीनिवास नार्वेकर यांनी मुंबईच्या मायानगरीत अनेक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, रंगकर्मी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्रभर अनेक शहरांमध्ये आवाज कार्यशाळा आयोजित करून नवोदितांना कलाकाराचा आवाज कसा असावा याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या नाट्यक्षेत्रातील अशाच अतुलनीय कार्याचा गौरव आहे. अशा या चतुरस्त्र रंगकर्मीला मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे नाट्य प्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
