बारामतीचा बुवा कोलगावात घुसला
संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांचा संताप, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
सावंतवाडी
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा–सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, बारामतीहून आलेल्या एका संशयास्पद बुवामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे उमेदवार महेश सारंग यांच्या कोलगाव येथील निवासस्थानाच्या परिसरात हा बुवा संशयास्पद हालचाली करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला घेरले आणि प्रकरण चव्हाट्यावर आले.
सदर बुवा चारचाकी वाहनाने थेट बारामतीहून कोलगावात दाखल झाला होता. कोणतीही पूर्वकल्पना न देता तो महेश सारंग यांच्या निवासस्थानाबाहेर धार्मिक पुस्तकाचे पठण करत होता. या प्रकाराकडे महेश सारंग यांचे लहान बंधू व कोलगावचे उपसरपंच दिनेश सारंग यांचे लक्ष गेले. बुवाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याची झाडाझडती घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
ग्रामस्थांनी बुवाला घेरल्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बुवाला ताब्यात घेतले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कोलगाव परिसरात अनोळखी तरुणांची टोळी मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टोळीमागे ‘अदृश्य शक्तीचा हात’ असल्याची चर्चा असून, पोलिसांकडून केवळ गस्त वाढवण्यापलीकडे ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक गावाच्या सीमेवर निवडणूक आयोगाचे पथक तैनात असतानाही अशा प्रकारे अनोळखी टोळ्या आणि संशयास्पद व्यक्ती गावात घुसतातच कशा, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये तीव्र होत आहे.
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार महेश सारंग आणि अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांच्यात हाय-व्होल्टेज लढत सुरू आहे. अशा परिस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि कायदा–सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संशयास्पद बुवा आणि अनोळखी तरुणांच्या टोळीच्या घुसखोरीमुळे सध्या कोलगाव गावात वातावरण चांगलेच ‘टाईट’ झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
