उमेदवारी माघारीनंतर राजकीय हालचालींना वेग; निरवडेत झालेल्या भेटीने तळवडे मतदारसंघात नवी चर्चा सुरू
सावंतवाडी :
शिवसेना नेते व आमदार निलेश राणे यांनी निरवडे येथील राणे समर्थक खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तळवडे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या गावडे यांनी महायुतीकडून स्थानिक उमेदवार न दिल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली.
अर्ज मागे घेताना प्रमोद गावडे यांना अश्रू अनावर झाले होते. काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळत नसल्याची भावना यावेळी व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले. गावडे यांनी पक्षाने स्थानिकांना डावलल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांच्या निर्णयाचा सन्मान राखत त्यांनी अखेर उमेदवारी मागे घेतली.
प्रमोद गावडे हे कट्टर राणे समर्थक असून गेली तीन दशके नारायण राणे यांच्यासोबत कार्यरत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. अशा पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी थेट गावडे यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हेही उपस्थित होते.
या भेटीनंतर नेमके राजकीय बळ कुणाला मिळणार, तसेच आगामी घडामोडींवर याचा काय परिणाम होणार, याबाबत विविध तर्क-वितर्कांना आता वेग आला आहे.
