देवगड व्यापारी एकता मेळाव्यात ग्राम उद्योग क्रांतीचा नवा मंत्र
देवगड :
हरित, धवल आणि शैक्षणिक क्रांतीनंतर आता महाराष्ट्रात ग्राम उद्योग क्रांतीची ठाम पावले पडू लागली आहेत. “गाव तिथे उद्योजक” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला असून, येत्या दोन ते चार वर्षांत राज्यातील ३६ जिल्ह्यांतून ३६ हजार उद्योजक घडवले जातील, असा विश्वास अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी व्यक्त केला.
देवगड तालुका व्यापारी संघाच्या आयोजनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा देवगड येथील शेठ. म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन रविंद्र माणगावे यांच्या हस्ते झाले.
डिजिटल स्वीकारा, स्पर्धेत आघाडी घ्या
उद्घाटनपर मनोगतात माणगावे यांनी स्थानिक व्यापाऱ्यांनी काळानुसार बदल स्वीकारण्याचे आवाहन केले. ऑनलाईन व्यापाराच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑनलाईन विक्री, बल्क खरेदी यांसारखे पर्याय अंगीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रत्येक गावात उद्योग उभा राहावा यासाठी चेंबर सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनुभव, तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित व्यापार
माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांनी मूल्याधिष्ठित व्यापार दीर्घकाळ टिकतो, असे सांगत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला. तर महेश चव्हाण यांनी गुंतवणुकीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. माजी आमदार अजित गोगटे यांचीही उपस्थिती होती.
जिल्ह्यातील संधी, महासंघाची वाटचाल
उद्योजक अविनाश पेडणेकर यांनी सिंधुदुर्गात लॉजिस्टिक, पर्यटनपूरक व पर्यावरणपूरक उद्योगांसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. महासंघासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयाची गरजही त्यांनी मांडली.
महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी व्यापारात महिलांचा वाढता सहभाग अधोरेखित केला.
महासंघाचे सरचिटणीस नितीन वाळके यांनी वार्षिक आढावा सादर करत आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण समिती, पावसाळी पर्यटन, अन्नसुरक्षा परवाना नूतनीकरण मोहीम, प्रशिक्षण कार्यशाळा आणि आपत्कालीन एक कोटी रुपयांचा सहाय्यता निधी या उपक्रमांची माहिती दिली.
देवगडचा पुढाकार
तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांनी देवगड व्यापाऱ्यांचा महासंघात मोठा वाटा असल्याचे सांगत व्हॉट्सॲपद्वारे महावितरणशी कनेक्टिव्हिटी, १०० वर्षे पूर्ण आस्थापनांचा सन्मान आणि व्यापारी पर्यटन संस्थेची पहिली स्थापना यांचा उल्लेख केला. जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी अध्यक्षीय मनोगतात महासंघ प्रगतीपथावर असल्याचा अभिमान व्यक्त केला.
पुरस्कारांचे मानांकन :
आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार – श्रीकांत जोईल, वैष्णवी जोईल
आदर्श व्यापारी व शेतकरी पुरस्कार – प्रसन्न गोगटे
जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ व्यापारी राजाराम कदम
कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार – सौ. सुषमा सदानंद देसाई
कै. भाईसाहेब भोगले स्मृती युवा उद्योजक पुरस्कार – विजय उर्फ बंटी प्रमोद कदम
कै. बापू नाईक स्मृती पर्यटन व सेवा उद्योग पुरस्कार – रानमाणूस प्रसाद गावडे (दोडामार्ग)
उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार – उमेश नेरुरकर (मालवण)
उद्घाटनापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुबल व सौ. विद्या माणगावकर यांनी केले.
