You are currently viewing कर्नाटकमधील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची चमकदार कामगिरी!

कर्नाटकमधील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची चमकदार कामगिरी!

सावंतवाडी :

कर्नाटक राज्यातील हुबळी येथील डाॅ.प्रभाकर कोरे केएलई टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी यांच्यातर्फे रिपब्लिक कप राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्ज या दोन प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत भारत, अमेरिका, मलेशिया या देशातील तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या आठ विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, तनिष तेंडोलकर, विघ्नेश अंबापूरकर, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, योगी लेले, राजेश विरनोडकर या विदयार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

बाळकृष्ण पेडणेकर याने रॅपिड स्पर्धेत नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुण मिळवले आणि ब्लिट्ज स्पर्धेत पाच राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड बरोबरीत सोडवून सहा गुण मिळवले. बाळकृष्णने रॅपिड स्पर्धेत मुख्य गटात सोळावा क्रमांक आणि ब्लिट्ज स्पर्धेत अठरावा क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम आणि गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्णने आंतरराष्ट्रीय रेटिंग दहा गुणांनी वाढवले. तनिष तेंडोलकर याने रॅपिड स्पर्धेत चार राऊंड्स जिंकून आणि तीन राऊंड्स बरोबरीत सोडवून साडेपाच गुण मिळवून सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळवला. हर्ष राऊळ याने रॅपिड स्पर्धेत चार राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून पाच गुण मिळवून चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात चौथा क्रमांक मिळवला. दोन्ही विद्यार्थ्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तनिष व हर्ष यांनी आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग सोळा गुणांनी वाढवले. आठ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने दहा वर्षाखालील गटात ब्लिट्ज स्पर्धेत आठवा क्रमांक आणि रॅपिड स्पर्धेत नववा क्रमांक मिळवला. पुष्कर केळूसकर याने चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात दहावा क्रमांक मिळवला. दोघांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.

मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी मागील दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त करुन जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. यावेळी पाटणकर वाड्याचे दिलीप पाटणकर, सौ.अश्विनी पाटणकर आणि सुशांत पाटणकर यांनी मुलांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा