डोअर-टू-डोअर प्रचारातून विकासाचा शब्द, शुद्ध पाणी आणि मूलभूत प्रश्नांवर ठोस आश्वासन
कणकवली :
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात डोअर-टू-डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधताना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा आपल्या बाजूने असलेल्या राजकीय वातावरणाचा स्पष्ट संकेत असल्याचे मत अनंत पिळणकर यांनी व्यक्त केले.
फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोरे पंचायत समिती क्षेत्रातील श्री गांगोलोरे चाळ येथे फोंडा जिल्हा परिषद उमेदवार अनंत गंगाराम पिळणकर व लोरे पंचायत समितीचे उमेदवार कीर्ती कृष्णा एकावडे यांनी लोरे गंगोचाळा मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. धार्मिक स्थळी प्रचाराचा प्रारंभ करून मतदारांपर्यंत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
या प्रचारावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, गौरव एकावडे, तनया तोरस्कर, स्वाती घाडी, दर्शन मराठे, विशाल राणे, संतोष चव्हाण, रामदास पाटकर, अमित लाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
घरोघरी भेटी दरम्यान स्थानिक प्रश्न ऐकून घेताना फोंडाघाट मधील शुद्ध पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही अनंत पिळणकर यांनी मतदारांना दिली. विकास, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या रोजच्या अडचणी या मुद्द्यांवर केंद्रित प्रचारामुळे मतदारसंघात सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण होत असून, आगामी निवडणुकीत विकासाभिमुख राजकारणाला पसंती मिळेल, असा ठाम विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
