You are currently viewing मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. झालेल्या बदलानुसार ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव देखील असणार आहे. मतमोजणी आणि श्री देवी आंगणेवाडी जत्रा याच दिवशी येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी साजरा होत असताना, संयम, शिस्त आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी संयुक्त निवेदनाव्दारे केले आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा, वाहतूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचबरोबर आंगणेवाडी जत्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच जिल्ह्याबाहेरून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. त्यामुळे रस्ते, वाहतूक मार्ग, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात अनधिकृत गर्दी करू नये, कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये. प्रशासनाने वेळोवेळी  दिलेल्या  निर्देशाचे नागरिकांनी पालन करावे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास मतमोजणी प्रक्रीया आणि आंगणेवाडी जत्रेचे नियोजन शांततेत आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा