कुडाळ :
आज घडलेल्या भीषण विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह कुडाळ तालुक्यातही शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या दु:खद घटनेच्या निषेधार्थ व अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील नेरूर चव्हाटा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली. ही घटना अत्यंत दु:खद व मनाला चटका लावणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
